अखेर…बचाव समितीच्या मागणीला यश; बारामती ॲग्रो ला आदिनाथ भाडेकराराने देण्याचा ठराव रद्द

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २० मार्च रोजी झालेल्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत आदिनाथ कारखाना बारामती ॲग्रो कारखान्याला भाड्याने देण्याचा ठराव रद्द करावा. ही मागणी २८२ मतांनी मंजूर झाली असून विरोधात फक्त ३४ मते पडली आहेत. आदिनाथ सहकारी साखर कारखाना प्रशासनाच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. आदिनाथ कारखाना बारामती ॲग्रो ला भाडेकराराने देऊ नये या बचाव समितीच्या मागणीला अखेर यश आले आहे.
दिनांक १९ जुलै २०१९ रोजी च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक ०९ प्रमाणे आदिनाथ बारामती अग्रो कारखान्याला भाड्याने देण्याचा ठराव झाला होता. मागील सभेचे झालेले प्रोसिडिंग मंजूर करताना ठराव २७७ मताने नामंजूर करण्यात आला. यामुळे मागील वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेला बारामती ॲग्रो कारखान्याला आदिनाथ भाड्याने देण्याचा ठराव रद्द झाला. यावर्षीच्या २० मार्च २०२२ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक १० बचाव समितीच्या विनंतीवरुन घेण्यात आला होता. या ठरावाला २८२ सभासदांनी होकार देऊन बारामती ॲग्रो ला भाडेकराराने कारखाना देण्याचा ठराव २८२ सभासदांनी रद्द करण्याच्या बाजूने मतदान केले.
विषय क्रमांक ११ प्रमाणे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाची रक्कम राज्य शिखर बँकेने पुनर्गठन करावी. या मागणीचा ठराव २९९ सभासदांनी मंजूर केला. या ठरावाच्या विरोधात केवळ ०५ मते पडली.
तालुक्यातील प्रत्येक ऊस उत्पादक सभासद यांची इच्छा होती आदिनाथ कारखाना सहकार तत्त्वावर चालला पाहिजे. हीच भूमिका आम्ही घेतली आहे. आता सभासदांनी मान्यता दिली आहे. आता तात्काळ संचालक मंडळाने पुढील पत्रव्यवहार करून कारवाई करावी.
हरिदास डांगे निमंत्रक, आदिनाथ बचाव समिती
आदिनाथ कारखाना अत्यंत कमी किमतीत हडप करायचा व करमाळा तालुक्यात आपले राजकीय बस्तान बसवायचे या दृष्टीने आमदार रोहित पवार यांनी या आदिनाथ कारखान्यात लक्ष घातले होते. पवारांचे करमाळा तालुक्यातील काही बगलबच्चे या पापाचे भागीदार झाले होते. या सगळ्यांचे पितळ उघडे पडले आहे.
बापूराव नीळ सदस्य, आदिनाथ कारखाना बचाव समिती




