करमाळा तालुक्यात ज्वारी काढणीला वेग; मात्र, हवामान बदलामुळे उत्पादन घटण्याची शक्यता
✍️ प्रा. मनोज बोबडे


करमाळा, जि. सोलापूर
करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात ज्वारी या पिकाच्या काढणीला वेग आला असून वातावरणातील बदलामुळे ज्वारी पिकाचे उत्पादन घटणार आहे. ग्रामीण भागात हुरडा पार्टीचे ही प्रमाण कमी झाले आहे. तालुक्यात या वर्षी साधारण २५ हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ४६ टक्के ज्वारीची पेरणी झाली होती. जिरायती पट्ट्यातील रब्बी हंगामातील ज्वारीच्या काढणीला वेग आला आहे. ज्वारी पिकाची काढणी तशी अवघड मानली जाते. शेताला चांगले खतपाणी असले तर काढणीला त्रास होत नाही. रान कडक झाले असल्यास ज्वारीचे ताट उपटले जात नाही. त्यामुळे बोटे कापणे, फोड येणे, शिरळ भरणे असे प्रकार घडतात. त्यामुळे सध्या ज्वारी काढणीला मजूर मिळत नाही.
अलिकडे इतर पिकाच्या तुलनेत ज्वारी पीक घेणे मोठे जिकीरीचे झाले आहे. बाजारभाव चांगला असला तरी ज्वारीची काढणी, मळणी या गोष्टी अधिक कष्टाच्या झाल्या आहेत. मजूर मिळत नसले तरी मित्र मंडळी, नातेवाईक किंवा सावड करून ज्वारीची काढणी केली जाते. सांगली, सोलापूर भागातील मालदांडी या जातीच्या ज्वारी बियाणांची पेरणी या परिसरात शेतकरी करतात.
जिरायत भागात अवकाळी पाऊसाच्या हजेरीने यंदा ज्वारी पीक जोमात येईल. असे वाटले होते. नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात ढगाळ वातावरण, धुके व सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे ज्वारी कणसात येऊन दाणा भरला नाही. काही ठिकाणी या वातावरणामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर झालेला पहावयास मिळतो. त्यामुळे ज्वारीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे, असे असले तरी ज्वारीच्या ताट जोमात आले असून कडबा चांगल्या प्रकारे निघणार आहे. त्यामुळे कडब्याला ही चांगल्या प्रकारचा भाव मिळण्याची शक्यता आहे



