करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


बँक ऑफ इंडिया शाखा करमाळा येथील शेतकी अधिकाऱ्याकडून शेती कर्जासाठी अडवणूक होत असल्याबाबत, शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याबाबत तसेच शेतकऱ्यांची सर्व कागदपत्रे पूर्ण असताना देखील वेळेवर पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. यासंबंधीचे निवेदन प्रहारचे युवक तालुकाध्यक्ष विकी मोरे व उपाध्यक्ष पप्पू ढवळे यांनी करमाळ्याचे मा. तहसीलदार साहेब व बँक ऑफ इंडीया, करमाळा शाखेचे शाखाधिकारी यांना दिले.
सदर निवेदनामध्ये त्यांनी सांगितले आहे की, या बँकेमध्ये शेतकऱ्याची प्रकरणे विनाकारण थांबवली गेली मागे राहिली तर बँक ऑफ इंडिया शाखा करमाळा येथील बँकेसमोर अर्धनग्न व हलगीनाद आंदोलन करण्यात येईल. बोरगाव भागातील काही शेतकऱ्यांनी विकी मोरे यांना फोन करून तसेच प्रत्यक्षात भेटून शेतकी अधिकाऱ्याकडून होत असलेली पिळवणूकीची व्यथा मांडली. गेल्या काही दिवसापासून कागदपत्रांसाठी हेलपाटे मारावे लागत होते. तसेच मंजुर झालेल्या पिक कर्जाची रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर सोडण्यासाठी आठवडा आठवडा वेळ लागत आहे. एकदा दिलेली कागदपत्रे पुन्हा नंतर आणावी लागतील असे सांगितले जात होते. या सर्व प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांचे हेलपाटे मारून हाल होत होते. बँक ऑफ इंडिया, शाखा करमाळा येथील शाखाधिकारी यांना भेटल्यानंतर त्यांनी रखडलेली प्रकरणे तात्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बोरगाव गावचे ग्रामस्थ अतुल पाटील, आदेश भोगल, जयसिंग घाडगे, तुकाराम घाडगे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.




