प्रतिनीधी/अंगद भांडवलकर


खांबेवाडी ता. करमाळा येथील श्री. आण्णासाहेब सूपनवर यांची बळीराजा शेतकरी संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. सदर निवड बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. पंजाबराव पाटील, प्रदेश अध्यक्ष बी.जे. काका पाटील, सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री. माऊली भाऊ जवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
वैकुंठभूमी पंढरपूर नगरी मध्ये आज गुरुवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ रोजी बळीराजा शेतकरी संघटनेची बैठक झाली. या बैठकीमध्ये सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री. माऊली भाऊ जवळेकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री. सर्जेराव शेळके, जिल्हा उपाध्यक्ष श्री. रमेश भोसले, पेनूर शाखाध्यक्ष वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या निवडीनंतर नुतन जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुपनवर म्हणाले की, माऊली भाऊ जवळेकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये गाव तिथे शाखा व घराघरांमध्ये बळीराजा शेतकरी संघटना पोहोचवण्याचे काम करणार आहे. साखर कारखानदारांकडून एफ आर पी प्रमाणे उसबिल तसेच शेतकऱ्याकडून वीज बिलाची केली जाणारी पठाणी वसुली याच्याविरोधात संघटनेमार्फत सोलापूर जिल्ह्यामध्ये आक्रमक आंदोलन केले जाईल. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी बळीराजा शेतकरी संघटनेमार्फत प्रयत्न करून शेतकऱ्यांना विविध माहिती व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. करमाळा तालुक्यातील बळीराजा शेतकरी संघटनेचे केलेल्या कामाची पावती मिळाली असल्याचेही मत त्यांनी शेवटी व्यक्त केले.




