प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


अहमदनगर टेंभुर्णी राज्य मार्गावरील करमाळा तालुक्यातील जातेगाव ते कंदर दरम्यान रस्त्याची झालेली दुरावस्था दूर करून, तात्काळ खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी. या मागणीसाठी दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:०० वाजता पद्मसिंह पाटील विद्यालय येथे होणारे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते. परंतु, प्रत्यक्ष रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात झाल्याने तूर्तास रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याही माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.
०९ फेब्रुवारी रोजी या आंदोलनाची नोटीस सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी करमाळा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात दिली होती. यामध्ये दिनांक १३ फेब्रुवारी पर्यंत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास १४ फेब्रुवारी रोजी रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. परंतु, काल दिनांक १० फेब्रुवारी पासूनच या रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात झालेली आहे. आज दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पांगरे भाळवणी या गावांच्या सीमेवर प्रत्यक्ष काम सुरु असल्याची पाहणी केली. त्यामुळे या आंदोलनाच्या पवित्र्याला यश आले आहे. या कार्यकर्त्यांना बांधकाम उपअभियंता मा. उबाळे साहेब यांनी भेटीस बोलावले व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. या चर्चेदरम्यान श्री. उबाळे यांनी दुरुस्तीचे सुरू केलेले हे काम जलद गतीने चालू ठेवण्यात येईल हे काम मध्यंतरी थांबवणार नाही. कामाचा दर्जा देखील उत्कृष्ट ठेवू अशा प्रकारचे आश्वासन दिल्याने व प्रत्यक्ष काम चालू झाल्याने दिनांक १४ फेब्रुवारी रोजीचे नियोजित रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
यावेळी आदिनाथ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजी बंडगर, प्रगतशील बागायतदार महेंद्र पाटील, शेतकरी संघटनेचे हनुमंत यादव, अर्जुन आबा तकिक, सरपंच शिवाजी सरडे, विष्णू पाटील, नवनाथ केवारे, बाबू पिसाळ, देवा तळेकर, अंकुश चौधरी, कविटगावचे पोलीस पाटील व बांधकाम उपविभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. वाघ साहेब हे प्रत्यक्ष काम चालू असलेल्या स्थळा वरती उपस्थित होते.



