
माय मराठी न्युज प्रतिनिधी


येवला तालुक्यातील मौजे वाघाळे येथील ग्रामपंचायत कार्यालयातील ग्राम रोजगार सेवक दत्तू सोमासे यांच्यावर गावातील काही व्यक्तींनी खोटे आरोप करून पंचायत समिती येवला यांचेकडे खोटी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत काहीही निष्पन्न न झाल्याचा राग धरून नंदू त्र्यंबक सोमासे, धनंजय त्र्यंबक सोमासे व त्रंबक सोमासे यांनी दत्ता सोमासे यांना त्यांच्या शेतात जाऊन मारहाण केली. तसेच गावातील ग्रामसभेला हजर राहिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याबाबत ची तक्रार येवला पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, वाघाळे ग्रामपंचायत कार्यालयात श्री. दत्तू कचरू सोमासे हे ग्राम रोजगार सेवक म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर गावातील काही लोकांनी भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली होती. सदरच्या तक्रारीची चौकशी विस्तार अधिकारी यांचेमार्फत केली असून तक्रार निकाली काढण्यात आली आहे. यामध्ये श्री. दत्तू कचरू सोमासे हे निर्दोष असून त्यांना पुन्हा पदावर घेण्यात येऊन सदर अहवाल ग्रामसभेवर ठेवण्यात यावा व तसा ठराव ग्रामसभेत पास करावा. असा निष्कर्ष विस्तार अधिकारी तथा चौकशी अधिकारी ए.आर. यादव यांनी दिला आहे.

फिर्यादी दत्तू ओमासे यांना पुन्हा कामावर घेण्याच्या निष्कर्षांचा राग मनात धरून व पूर्ववैमनस्यातून गावातील गुंड प्रवृत्तीचे नंदू त्र्यंबक सोमासे, धनंजय त्र्यंबक सोमासे व त्र्यंबक सोमासे यांनी दिनांक १० डिसेंबर २०२१ रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी दत्तू सोमासे हे वाघाळे शिवारात आपल्या शेतामध्ये काम करीत असताना तेथे येऊन म्हणाले की, निकाली काढलेल्या तक्रारीची सुनावणी सोमवारी (१३/१२/२०२१) ग्रामसभेत मांडायची आहे. त्यासाठी तू गावात येऊ नको या कारणामुळे भांडण होऊन फिर्यादीस हाताने, काठीने मारहाण करून वाईट साईट शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्या बाबतची तक्रार फिर्यादीने येवला ग्रामीण पोलिस ठाणे येथे केली आहे.
दत्तू सोमासे हे एक गरीब कुटुंबातील असून सुशिक्षित आहे. त्यांनी येवला तालुका पोलिस स्टेशन येथे तक्रार देऊन न्यायाची मागणी करून सोमवार दिनांक १३ डिसेंबर २०२१ रोजीच्या ग्राम सभेस हजर होण्यासाठी सदर गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच याबाबत निवेदनाच्या प्रति त्यांनी मा. मुख्यमंत्री साहेब, मा. विरोधी पक्ष नेते व एस पी कार्यालय नाशिक ग्रामीण यांचेकडे पाठविल्या आहेत.




