-->
करमाळाकृषी विषयकराजकियराज्य

ब्रह्मदेवच काय.. ब्रह्मदेवाचा बाप जरी खाली आला तरी वीजबिल नाही भरणार; पण येणाऱ्या निवडणुकीत कार्यक्रम करेक्ट करणार

 

 

माय मराठी न्युज नेटवर्क

 

 

“ब्रह्मदेव तर सोडाच ब्रम्हदेवाचा बाप जरी वरून खाली आला तरी वीज-बिल भरणार नाहीच… परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीमध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघात तुमचा हाच शेतकरी करेक्ट कार्यक्रम करणार व त्याचबरोबर तुमच्या नावाने मतांचा जोगवा मागणार्यांचा सुध्दा मतदार येणाऱ्या निवडणुकीतच करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही…”

 

 

सध्या करमाळा मतदारसंघातील शेतकरी उसाच्या बाबतीत होरपाळून निघाला आहे. जसेच्या तसेच शेतकऱ्यांचे ऊस शेतामध्ये उभा दिसत आहेत. उन्हाचे वाढते प्रमाण व उसाला आलेले झेंडे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहेत. उसाचे घटत चाललेले वजन यातून शेतकरी कसातरी सावरतो न सावरतो त्यातच महावितरण कंपनीने महाविकास आघाडी सरकारच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची लाईट बंद करून शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे. वर्षातून ३-४ वेळा शेतीपंपाची विजबिले वसूल करणारे हे वसुली सरकार काही केल्या थांबायला तयार नाही. उलट “ब्रम्हदेव आला तरी विजबील वसुलच करणार मग तुम्ही आत्महत्या करा. पण वीज-बिल आम्ही सोडणार नाही.” असे म्हणत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर ही मंडळी तीन चाकावर कारभार करत आहे. त्याच शेतकरी वर्गाला ही मंडळी विसरली. म्हणुन शेतकऱ्यांना नक्कीच सांगावस वाटत की, आपण ही काळ्या मातीत जन्माला आलो आहोत. काळ्या मातीच्या आईची शप्पथ घेऊन सांगतो येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत “ब्रह्मदेव तर सोडाच त्याचा बाप जरी खाली आला तरी या तीन चाकी सरकारला व त्यांच्या नावाने मतांचा जोगवा मागणाऱ्यांना मतदान करणार नाही.” अशी शपथ आज आम्ही शेतकरी म्हणून घेतो.

 

 

ही चालू असलेली पठाणी वसुली थांबवा नाहीतर येणाऱ्या काळात नियती एक वेळ तुम्हाला माफ करेल पण हा शेतकरी तुमच्या ह्या कर्माला कधीच माफ करणार नाही. आहो त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाकडे तरी बघा त्यांच्या कोणत्याच उत्पादनाला भाव नाही, वेळेवर पाणी नाही, वेळेवर लाईट नाही, वेळेवर अन्न नाही, लेकराबाळांच्या केसाला तेल नाही. प्रत्येक वेळी नुसती संकटेच त्यात तुम्ही मंडळींनी शेतकऱ्यांच्या जीवनाचा खेळ मांडला आहे. हे लक्षात घ्या शेतकऱ्यांच्या घामाच्या एक ना एक थेंबाचा हिशोब ईश्वर तुमच्याकडून वसूल केल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या लेकरांच्या तोंडातला खास तुम्ही हिसकावून घेतला. जे-जे कोणी या महापापात सहभागी असतील त्यांना आम्हा शेतकऱ्यांचा शाप आहे की, जी अवस्था तुम्ही तीन चाकी महाविकास आघाडी सरकारने आमच्या कुटुंबाची केली त्याच्यापेक्षा कित्तेक पटीने वाईट अवस्था तुमच्या कुटुंबाची होणार हा आम्हा शेतकऱ्यांचा तुम्हाला तळतळाट आहे.

 

 

मुळात म्हणजे आम्ही शेतकरी म्हणून जन्म घेऊनच चूक केली. रात्रीचा दिवस करून, पोटाला चिमटा घेऊन, काबाडकष्ट करून शेतात पीक पिकवायची व तुमची खळगी भरायची. तुम्ही आम्हा शेतकऱ्यांच्या जीवावर तिकडे मज्जा मारायची. एक लक्षात ठेवा येणाऱ्या काळात जर का शेतकऱ्यांनी स्वतःला जगण्यापूरते उत्पादन काढण्याचे ठरवले तर तुम्ही काय भीक मागून जगणार आहात काय.?

तुम्ही शेतकऱ्यांची कितीही पिळवणूक करा पण येणाऱ्या काळात हा शेतकरी राजा तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही. आज आम्हावर वेळ तुम्ही आणली पण हे लक्षात ठेवा. “ज्या वेळी आमची वेळ येईल तेव्हा, जर आमच्या टप्प्यात तुम्ही आला ना तर तुमचा करेक्ट कार्यक्रम करायला आम्हाला थोडा ही वेळ लागणार नाही.” आज वेळ आमच्यावर आली जेव्हा हीच वेळ तुमच्यावर येईल तेव्हा आम्ही पण तुम्हाला नाही नांगरासकट… लावला ना तर शेतकऱ्यांची औलादच सांगणार नाही.

 

 

माझी सर्व शेतकरी बंधू-भगिनींना हात जोडून विनंती आहे की, जशी ही मंडळी सत्तेसाठी रातोरात एकत्र आली व आपल्या पिठात माती मिसळून आपल्या कुटुंबावर यांनी आत्महत्या करण्याची वेळ आणली. त्यांना आपणही सर्व शेतकरी बांधव एकत्र येऊन त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. यांनी आज शेतकऱ्यांची लाईट बंद केली. आपण यांना करमाळा मतदारसंघात तर सोडाच परंतु महाराष्ट्र राज्यात देखील फिरू दिल नाही ना तेव्हा यांचा माज उतरेल व तेव्हा आपल्यावर ही मंडळी अन्याय करणार नाहीत. म्हणून येणाऱ्या जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणूकीत कसल्याही प्रकारच्या भूल- थापांना बळी पडू नका व यांना यांची जागा दाखवून द्या एवढीच एक शेतकरी म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती.

 

 

आपलाच…

“या तीन चाकी मंडळींनी होरपळून काढलेल्या महाराष्ट्राबरोबरच करमाळा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी राजा…”

 

(ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.)

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close