केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारील तालमीची दुरूस्ती करावी. अशी मागणी केम येथील पैलवान मदन तात्या तळेकर यांनी केम ग्रामपंचायतीकडे केली आहे.
कुस्ती हा एक महाराष्ट्रामध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळा पैकी प्रसिद्ध खेळ आहे. अनेक दिग्गज पैलवान या मातीत घडले आहेत. परंतु, केम सारख्या मोठया गावात याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. या तालमीत केम व परिसरातील मुले व्यायाम करण्यासाठी व कुस्ती शिकण्यासाठी येतात. परंतु, केम येथील कुस्ती जिथे खेळली जाते त्या तालमीची पडझड झाली आहे. तालमीमध्ये मुलांना राहण्याची व्यवस्था नाही. यासाठी ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करून ही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. असा आरोप पैलवान मदन तात्या तळेकर यांनी केला आहे.
सुरूवातीला केम ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या वरील खोली मुलांसाठी दिली होती. परंतु, काही काळाने खोटी कारणे सांगून ग्रामपंचायतीने सदर खोली रिकामी करायला लावली. आता सध्या कुस्ती शिकण्यासाठी येणारी मुले या पडक्या तालमीत थांबतात. त्यामुळे धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी केम ग्रामपंचायतीने या तालमीची दुरुस्ती करावी अशी मागणी तळेकर यांनी केली आहे.



