केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील कंदर-वडशिवणे-केम या रस्त्याची दुरवस्था झालेली असून या रस्त्यावरील खड्डे बुजवून साईट पट्यांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत करावे. अशी मागणी केम, वडशिवणे येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
कंदर-केम हा रस्ता टेंभुर्णी-नगर या महामार्गाला जोडलेला आहे. त्यामुळे या रस्यावर मोठ्या प्रमाणावर लहान मोठ्या वाहनाची वर्दळ असते. हा रस्ता एकेरी असल्यामुळे या रस्यावरून एकाच वेळी दोन गाड्या आल्या तर वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वाहनधारकाला वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्यावर खूप खड्डे पडलेले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता आहे हेच समजत नाही. त्यामुळे या रस्यावर सतत लहान मोठे अपघात होत आहेत.
या रस्यावरून आलेगाव, अकलूज, आष्टी, करमाळा, पिंपळनेर यांसह आदि साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक केली जात आहे. या रस्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने घसरत असून आज दि. २१ नोव्हेंबर रोजी ऊसाने भरलेली एक ट्रॉली ऊलटली आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. रस्ता अरुंद असल्याने भरतीच्या वाहनांना रस्त्यावरून खाली ऊतरता येत नाही. रस्त्याच्या बाजूला साईट पटया भरलेल्या नसल्यामुळे समोरून आलेल्या वाहनाना साईट देता येत नाही. त्यामुळे वाहनधारकाना या रस्त्यावरून वाहने चालविने जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे रस्त्यावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
आम्हा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना रात्री अपरात्री साखर कारखान्याला ऊस घेऊन जाताना जीव धोक्यात घालून ऊस वाहतूक करावी लागत आहे. तरी या रस्त्यावरील खड्डे लवकर बुजवावीत.
दत्तात्रय बिचीतकर
ऊस वाहतूकदार




