कौर्याची परिसीमा: सहा महिन्यांत अल्पवयीन मुलीवर पोलिसांसह अनेकांनी केले लैंगिक अत्याचार

माय मराठी न्युज नेटवर्क


बीड (अंबाजोगाई)
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात एका अल्पवयीन मुलीवर पोलिसांसह अनेकांनी सतत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केली असून बालविवाह आणि पोक्सो कायदा अंतर्गत आतापर्यंत १५ जणांची चौकशी करण्यात आली आहे. त्यातील १० संशियतांना अटक करून अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यामध्ये अंबाजोगाई शहरात राहणाऱ्या एका महिलेला व ग्राहक शोधण्याचं काम करणाऱ्या एका निलंबित मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित अल्पवयीन मुलीचे तेराव्या वर्षीच धारूर तालुक्यातील एका गावामधील तरुणासोबत लग्न लावून दिले गेले होते. या पीडित मुलीचा पती एका ढाब्यावर काम करून आठवड्यातून दोन-तीन दिवस घरी येत असे. तेव्हा तो आल्यावर पीडितेला मारहाण करायचा म्हणून या मारहाणीला वैतागून ती आपल्या माहेरी वडिलांकडे आली असताना जन्मदात्या पित्यानेच तिच्या अब्रूवर हात टाकला. या अत्याचारा विरोधात तिने पोलीस ठाणे गाठले. पण, तिथेही पोलिसांनी तीची तक्रार नोंदवून घेतली नाही. पोलिसांकडे तक्रार करायला गेली होती म्हणून घरात पीडित मुलीला विस्तवाचे चटके देण्यात आले. या सर्व त्रासाला कंटाळून तिने घरातूनही पळ काढला आणि अंबाजोगाई शहर गाठले. मात्र, तिथेही तिच्या दु:ख तिची पाठ सोडली नाही. अनेक नराधमांनी तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला.
या अल्पवयीन पिडीत मुलीने अत्याचाराला विरोध केल्यामुळे काहींनी तिला मारहाण देखील केली. कोणी पीडितेला दारू पाजून तर कोणी जेवायला देतो म्हणून लैंगिक अत्याचार केला. काहींनी तर तिच्याकडून वेश्याव्यवसाय ही करून घेतला. अत्याचार करणाऱ्या काही नराधमांनी पीडित मुलीबाबत अनेकांना माहिती दिली आणि तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले.
आपल्यावर होणार्या अत्याचाराची माहिती या पीडित मुलीने बालकल्याण समितीसमोर सांगितली आहे. यावेळी तिने सांगितले आहे की, आपण ज्यांच्याकडून समाजाच्या संरक्षणाची अपेक्षा ठेवतो त्या दोन पोलिसांनी देखील अत्याचार केला आहे. एका पोलिसाने लॉजवर तर दुसऱ्या पोलिसाने त्याच्या घरी नेऊन अत्याचार केला. या पीडितेला अत्याचार केलेल्या पोलिसांची नावे ठाऊक नाहीत. परंतू, या दोन पोलिसापैकी एकाने तिला अंबाजोगाई जवळच्या एका कला केंद्रावर सोडून तिथे नाचकाम करायला लावले होते.
दरम्यान, या प्रकरणात अंबाजोगाई न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढत या प्रकरणात आरोप असलेले पोलीस कर्मचारी अद्यापही तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना का सापडत नाहीत.? अशी विचारणा केली आहे. या पीडित मुलीने सुरुवातीला दिलेल्या माहितीप्रमाणे अंबाजोगाई पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून आणखी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.©️wd




