प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील काही भुरटे पत्रकार खोट्या बातम्या देतात अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये. असे वक्तव्य वैफल्यग्रस्त भावनेतून दिग्विजय बागल यांनी केले आहे. तर या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी आमच्या कार्यक्रमात सुपारी घेऊन पत्रकार आले आहेत. तुम्ही कुणाची सुपारी घेऊन पत्रकार परिषदेला आला आहात.? असा प्रश्न काही पत्रकारांना विचारून पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिली. या कार्यक्रमात दिग्विजय बागल व धनंजय डिकोळे या दोघांनीही पत्रकारांना बद्दल अपशब्द वापरल्यामुळे आज करमाळा तालुका पत्रकार संघाच्या झालेल्या तातडीच्या बैठकीत बागल यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
यावेळी करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पत्रकार संघाचे सचिव नासिर कबीर, प्रा. अशोक नरसाळे, अशपाक सय्यद, अलिम शेख, जयंत दळवी, आण्णासाहेब काळे, शेखर स्वामी, सचिन हिरडे, सचिन जव्हेरी, अशोक मुरुमकर, शंभुराजे फरतडे, सिद्धार्थ वाघमारे, विशाल घोलप, सुनिल भोसले, दिनेश मडके, सुनिल सुर्यपुजारी, आण्णासाहेब सुपनर, शितलकुमार मोटे, अतुल बोकन, दस्तगीर मुजावर आदि पत्रकार बांधव उपस्थित होते.
नुकतेच बागल गटाच्या नेत्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेतली होती. या संदर्भात काही पत्रकारांनी बातम्या छापल्या होत्या व राजकीय प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. यावर बोलताना शिवसेनेच्या मेळाव्यात दिग्विजय बागल म्हणाले की, काही भुरटे पत्रकार अशा बातम्या देतात. अशा भुरट्या पत्रकारांकडे लक्ष देऊ नका. याचा पत्रकार संघाने तीव्र निषेध केला आहे.
शिव संपर्क अभियानासाठी आलेले अनिल कोकीळ यांना पत्रकारांनी शिवसेनेच्या पक्षसंघटन संदर्भात काही प्रश्न विचारले. शिवसेनेला कुर्डूवाडी नगरपालिकेत मते जास्त पडतात पण विधानसभेला का मते कमी पडतात? गद्दारी कुर्डूवाडी मधून होते का करमाळ्यामधून होते? तसेच संघटनेतील गटबाजी बद्दल काही प्रश्न विचारले. यावेळी संपर्कप्रमुख अनिल कोकीळ उत्तर देत असताना धनंजय डिकोळे यांनी थेट संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांचे समोरच हे पत्रकार सुपारी घेऊन पत्रकारिता करतात असा अपशब्द वापरून अपमानास्पद वागणूक दिली. यावर काही पत्रकार व डिकोळे यांच्यात वाद झाला. यावेळी एका पत्रकाराने प्रतिप्रश्न विचारला यामुळे संतप्त झाल्याने अजून अपशब्द वापरले.
आज शिवसेना संपर्क अभियानाच्या कार्यक्रमात दिग्विजय बागल व धनंजय डिकोळे दोघे वैफल्यग्रस्त होऊन बोलत होते. यामुळे यांचा निषेध करत असल्याचा ठराव पत्रकार संघाच्या तातडीच्या बैठकीत करण्यात आला.




