-->
करमाळा

राजकीय श्रेयवादातून आजी- माजी आमदार समर्थकांत हाणामारी; कोंढेज गावात दहशतीचे वातावरण

 

करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी सध्या कोंढेज येथील तलावात सुरू आहे. तलाव अद्याप शंभर टक्के भरणे बाकी आहे. हे पाणी आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार देण्यात आलेले आहे, त्यामुळे तुम्ही पाण्याचे पूजन करू नका. पाणी पूजन करण्याचा श्रेयवादामुळे पाणी बंद होईल, विकासकामा मध्ये राजकारण नको अशी विनंती गावातील कार्यकर्ते अनिल फाटके यांनी माजी आमदार नारायण पाटील यांच्याकडे केली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून दहीगावच्या पाण्याचे राजकारण करून त्या पाण्याचे श्रेय घेण्याच्या भूमिकेतून माजी आमदार नारायण पाटील यांचे स्वीय सहाय्यक सुनील तळेकर हे कोंढेज तलावातील पाणी पूजनासाठी आले. यातूनच कोंढेज गावामध्ये राजकीय संघर्ष उद्भवला आहे.

दोन्ही गटाकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल

यामध्ये परस्परविरोधी फिर्यादी देण्यात आलेल्या आहेत. रेवणनाथ छगन लोंढे यांनी अनिल फाटके, रहीम शेख, राजेंद्र चांगन, महादेव आरणे, दशरथ लोंढे, पांडुरंग फाटके या आमदार शिंदे यांच्या समर्थक विरुद्ध फिर्याद दिलेली आहे. तर माजी आमदार नारायण पाटील यांचे गटाविरुद्ध पांडुरंग फाटके यांनी पृथ्वीराज नारायण पाटील, निखिल मारकड, आबा मारकड, रामा गलांडे, सुनील तळेकर यांचे विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

कोंढेजकर दहशतीच्या वातावरणात…

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचा राजकीय गटांकडून राजकारणासाठी उपयोग केला जात आहे. स्वतः आमदार असताना नारायण पाटील यांनी मतदारसंघांमध्ये जिथे पाणी दिले, तिथे त्या पाण्याचे पूजन इतर कोणत्याच आजी – माजी लोकप्रतिनिधींनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी कधीही केलेले नाही. असे असताना विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून सातत्याने दोन वर्षापासून दहिगाव उपसा सिंचन योजना सुरळीतपणे चालत आहे. कोणताही राजकीय आकस मनात न ठेवता त्यांनी पाण्यापासून कोणालाही वंचित ठेवले नाही. त्यामुळे दहिगाव योजनेच्या लाभक्षेत्रात आमदार शिंदे यांची लोकप्रियता कमालीची वाढू लागलेली आहे. याच राजकीय द्वेषातून माजी आमदार नारायण पाटील यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेचे चालू आवर्तन सुरू झाले की लगेच कोंढेज तलावात पाणी द्या अन्यथा, आम्ही आंदोलन करू असे निवेदन तहसीलदार आणि दहीगाव चे उपअभियंता यांना दिलेले होते. हे पाणी निवेदन दिल्यामुळेच आलेले आहे असे म्हणून या पाणी पूजनाचा घाट माजी आमदार पाटील यांच्या समर्थकांनी घातलेला दिसतो. माझ्याशिवाय दुसरे कोणीही दहिगाव योजना चालऊ शकत नाही, या माजी आ. पाटील यांच्या अहंकाराला छेद देऊन ही योजना आपणही चांगली चालऊ शकतो हे आमदार शिंदे यांनी दोन वर्षात प्रत्यक्ष कृतीमधून दाखवून दिले आहे. त्यामुळेच सदर राजकीय संघर्ष कोंढेज गावामध्ये घडलेला आहे. यामुळे मात्र कोंढेजकर सर्वसामान्य ग्रामस्थ दहशतीच्या वातावरणा खाली वावरताना दिसत आहेत. ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी या उक्तीप्रमाणे आ. शिंदे यांनी पाणी दिलेले असताना पाणी पूजनाचा माजी आ. पाटील यांनी घातलेला घाट चुकीचा आहे. अशी चर्चा सर्वसामान्य कोंढेजकर ग्रामस्थ करत आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close