माती परीक्षण नमुना कसा घ्यावा; कृषीकन्या रुपाली तळेकरचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
केम प्रतिनिधी/संजय जाधव


महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व कृषी महाविद्यालयांच्या अंतर्गत ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम हा कृषी विद्यार्थ्यांसाठी राबविला जातो. या कार्यक्रमा दरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय, आंबी ता. मावळ या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. रुपाली तुकाराम तळेकर हिने ग्रामीण कृषी जागरुकता कार्यक्रमा अंतर्गत करमाळा तालुक्यातील केम येथील शेतकऱ्यांना माती परिक्षणासाठी नमुना कसा घ्यावा व त्यापासून होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन केले.

कृषिकन्या रुपाली तळेकर हिने शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षण संबंधी जनजागृती व्हावी, यासाठी माती परिक्षण करण्यासाठी नमुना कसा घ्यावा याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. माती परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण अचूकपणे समजते. त्यानुसार खतांचा योग्य प्रमाणात पुरवठा करणे शेतकऱ्यांना सोपे जाते. तसेच पिकांच्या वाढीस आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोल राखता येतो. माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करावं, असा सल्ला ही यावेळी कृषीकन्या रुपाली तळेकर हिने उपस्थित शेतकऱ्यांना दिला.
दरम्यान केम येथील प्रगतशील शेतकरी श्री. सुभाष सुरवसे यांच्या शेतातील मातीचे नमुने गोळा करून ते परिक्षणासाठी माती परिक्षण केंद्रात पाठविण्यात आले. मातीमध्ये असणारे सामू, क्षारता, सेंद्रीय कर्ब, उपलब्ध नत्र, स्पुरद, पालाश, मुक्त चुनखडी, गंधक, लोह, जस्त, मंगल, तांबे या घटकांचे प्रमाण किती आहे हे माती परिक्षणाद्वारे शेतकऱ्यांना समजते व त्यानुसार पिकाची खतमात्रा निश्चित करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला. तसेच मातीमधील या घटकांविषयी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन देण्यात आले.



