-->
करमाळाविशेष

आमच्या नावावर काढलेले बेकायदेशीर कर्ज भरा अन्यथा आत्मदहन करू; शेतकऱ्यांचा आमदार तानाजी सावंत यांना इशारा

 

 

 

करमाळा प्रतिनिधी

आमच्या नावा वर आमच्या परस्पर भैरवनाथ शुगर विहाळ या कारखान्याने लाखो रुपयांचे कर्ज काढले असून हे कर्ज तात्काळ भरून आम्हाला कर्जातून मुक्त करावे अन्यथा आम्ही सामुदायिक आत्मदहन करू असा इशारा अर्जुन पंढरीनाथ गिरंजे राहणार भगतवाडी, शिवाजी लक्ष्मण टापरे राहणार भगतवाडी, श्रीराम चतुर्भुज खताळ राहणार आवटी या शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

 

या निवेदनात म्हटले आहे की, अर्जुन पंढरीनाथ गिरंजे यांच्या नावावर १४ लाख ०३ हजार रुपये कर्ज आहे, श्रीराम चत्रभुज खताळ यांच्या नावावर १४ लाख ०९ हजार रुपये कर्ज आहे तर शिवाजी लक्ष्मण टापरे यांच्या नावावर १४ लाख ११ हजार कर्ज आहे. अशाच प्रकारे जवळपास ५३० शेतकऱ्यांच्या नावावर बँक ऑफ इंडिया शाखा बार्शी मधून शेतकर्यांच्या परस्पर कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढल्याची चर्चा आहे. आता या शेतकऱ्यांना ॲडव्होकेट सुधाकर काळे व ॲडव्होकेट योगीराज पुरवत त्यांच्यामार्फत बँकेने रीतसर नोटिसा दिले आहेत. शेतकर्यांच्या परस्पर बँकेतून शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. असा भयंकर स्वरूपाचा गुन्हा करून सुद्धा भैरवनाथ शुगर चे संचालक मंडळ ताठ मानेने फिरत आहेत. हे कर्ज थकबाकीत गेल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नाही पिक कर्ज मिळत नाही त्यांची बँकेतील पत खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांना कसलेच नवीन कर्ज मिळत नाही. शासनाचे काही अनुदान आले, पिक विमा आला, शेतकरी सन्मान योजनेचे पैसे आले तर ही सर्व रक्कम बँक कर्ज खात्यात जमा करून घेत आहे. यामुळे शेकडो शेतकरी वैफल्यग्रस्त झाले असून तात्काळ हे भैरवनाथ कारखान्यांनी कर्ज न भरल्यास आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

 

शिवाय या कारखान्यांनी २०१८-१९ मधील शेतकऱ्यांचे प्रतिटन २६६/- प्रमाणे पैसे थकवले आहेत. ही रक्कम सुमारे चार ते पाच कोटी रुपयांची आहे. शिवाय शेअर्स म्हणून सभासदांकडून घेतलेले २०,०००/- रुपये शेतकर्‍यांना परत देण्यास टाळाटाळ करत आहेत. भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड चे चेअरमन आमदार तानाजी सावंत यांना अनेक शेतकऱ्यांनी फोन केल्यानंतर पैसे भरतो, करतो, देतो अशी उत्तरे देतात. वारंवार फोन केल्यास काय करायचे ते करा अशी उद्दाम भाषा वापरली जाते. अशी तक्रार अर्जुन पंढरीनाथ गिरंजे या शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनासोबत अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी वकिलामार्फत आलेल्या नोटिसा ची झेरॉक्स प्रत सर्व पत्रकारांना दिल्या. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरूरकर व साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना पाठविण्यात आल्या आहेत.

 

शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांना निवेदन देणार

माझे बंधू पोलीस असून त्यांनी सुद्धा आमदार तानाजी सावंत यांना फोन केला होता. तर त्यांनी कर्ज भरू, बघू असे उत्तर दिले. यासंदर्भात आम्ही सर्व शेतकरी मिळून आमच्यावरील अन्यायाला न्याय द्या म्हणून माजी आमदार नारायण पाटील यांना निवेदन देणार असल्याचेही अन्यायग्रस्त शेतकरी श्रीराम चतुर्भुज खताळ यांनी सांगितले. अशाच पद्धतीने आमदार संजय मामा शिंदे यांच्या विठ्ठल शुगर्स या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलले होते. याबाबत माजी आमदार नारायण पाटील यांनी आवाज उठवला होता. त्याच पद्धतीने भैरवनाथ शुगर बाबतीत सुद्धा नारायण पाटील यांनी आवाज उठवावा अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close