कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


ससून सारखे रुग्णालय पुणे शहराला लागून असणाऱ्या चारही महामार्गावर उभारणे गरजेचे असून सामान्य नागरिकांना देखील मोठ्या हॉस्पिटलमध्ये तातडीची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना असून नागरिकांनी देखील अश्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केले. शिरूर तालुक्यातील कोरेगांव भीमा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या माजी सभापती सुजाताभाभी पवार यांच्या विशेष प्रयत्नातून एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, मोहम्मदवाडी (हडपसर) व ग्रामपंचायत कोरेगाव भीमा यांच्या संयुक्त विद्यमाने आमदारांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित नेत्र तपासणी शिबिरात लाभार्थ्यांना मोफत चष्मे वाटप प्रसंगी आमदार बोलत होते.
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, माजी पंचायत समिती सदस्य पी. के. गव्हाणे, सरपंच अमोल गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य संदीप ढेरंगे, केशव फडतरे, शरद ढेरंगे, वंदना गव्हाणे, रेखा ढेरंगे, मनीषा गव्हाणे, वैशाली गव्हाणे, अर्चना सुपेकर, माजी सरपंच विजय गव्हाणे, बाळासाहेब फडतरे, माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे, नितीन गव्हाणे, राष्ट्रवादीचे तालुका संघटक बबुशा ढेरंगे, तालुका सरचिटणीस तुळशीराम फडतरे, नारायण फडतरे, विक्रम दौंडकर, भाजपाचे तालुका सरचिटणीस संपत गव्हाणे, शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष बापूसाहेब शिंदे, रवींद्र फडतरे, शांताराम फडतरे, ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले, देसाई हॉस्पिटलचे महावीर सोनवणे, सागर भोसले आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार पुढे म्हणाले की, प्रत्येक मोठ्या हॉस्पिटलमध्ये गरीब गरजू लोकांना मोफत उपचार व्हावेत या हेतुने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असतो. ज्या हॉस्पिटलमध्ये तो शिल्लक राहिला असेल तो इतर हॉस्पिटलमध्ये देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. कोरोना काळात हॉस्पिटलमध्ये बेड कमी उपलब्ध होत असल्याने रुग्णांची मोठी परवड झाली. यासाठी आपापल्या परिसरात सर्व सुविधांनी युक्त रुग्णालये उभारणे गरजेचे असुन स्थानिक प्रशासनाने आरोग्य, शिक्षण यावर विशेष जोर देण्याची गरज आहे. कोरोना काळात राव लक्ष्मी फाउंडेशन व इतर दानशूर लोकांच्या मदतीने कित्येक रुग्णांना मदतीचा हात देण्यात आला. तसेच आज फाउंडेशन, कोरेगाव भीमा ग्रामपंचायत व देसाई हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने अनेकांच्या डोळ्याची तपासणी करण्यात आली ही कौतुकास्पद बाब असल्याचे आमदार अशोक पवार यांनी यावेळी सांगितले.
यापुढील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा परिषद चा उमेदवार हा कोरेगाव भीमाचा असावा अशी मागणी करताना त्या उमेदवाराला बहुमताने निवडून देण्याचे आश्वासन यावेळी सरपंच अमोल गव्हाणे यांनी दिले. या नेत्र तपासणी शिबिराचे अंतर्गत ६५० रुग्णाची तपासणी तसेच ४० रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच ३१५ रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप यावेळी ग्रामपंचायतच्या सहकार्याने करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर तालुका उपाध्यक्ष रवींद्र फडतरे यांनी केले. तर आभार माजी सरपंच विजय गव्हाणे यांनी मानले.




