केम प्रतिनीधी/संजय जाधव


करमाळा तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशानुसार केम केंद्राची शिक्षण परिषद राजाभाऊ तळेकर विद्यालयात उत्साहात संपन्न झाली. सुरुवातीला शिक्षण परिषदेचे उद्घाटन स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन श्री उत्तरेश्वर हायस्कूल केमचे मुख्यध्यापक श्री. विष्णू कदम सर, राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मनोज तळेकर सर, शा. गो. पवार विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. धनंजय खंडाळे सर, शिवाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व केमचे सरपंच श्री. नागनाथ तळेकर सर, राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. रामचंद्र देशमुख सर, केमचे केंद्रीय मुख्याध्यापक श्री. भाऊराव तळेकर सर व केंद्रप्रमुख महेश्वर कांबळे सर या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उद्घघाटनानंतर राजाभाऊ तळेकर विद्यालय व शिवाजी प्राथमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी बापू तळेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आश्रम शाळेचे शिक्षक हरिचंद्र साळुंके सर यांच्या आई कमल साळुंके, खानटवस्तीचे मुख्याध्यापक आयुब मोमिन यांचे वडील युसूफ मोमीन व पाथुर्डी शाळेचे माजी मुख्याध्यापक शिवाजी तळेकर गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहून पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शिक्षण परिषदेमध्ये राजाभाऊ हायस्कूल विद्यालय केमचे देशमुख सर यांनी आपल्या विद्यालयात राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. NAS सर्वे बाबत मलवडी येथील श्रीमती राणी सातव मॅडम मलवडी यांनी मराठी विषयी, आश्रम शाळेचे श्री. जगताप सर व केंद्र शाळा केमच्या माधुरी चव्हाण मॅडम यांनी गणित विषयी तर बीचितकर वस्ती -१ चे शिक्षक श्री. सतीश कळसाईत सर यांनी परिसर अभ्यास विषयी माहिती सांगितली.
या शिक्षण परिषदेला भेट देण्यासाठी करमाळा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी मा. अनिल बदे साहेब यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. मार्गदर्शनपर बोलताना श्री. साहेब म्हणाले की, शिक्षकांनी आपल्या वैयक्तिक शारीरिक आरोग्याकडे ही लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याचेही शिक्षकांना आवाहन केले. दुसऱ्या सत्रामध्ये Read to me ॲप इन्स्टॉल कसे करायचे याविषयी माहिती निंभोरे शाळेचे प्रताप भोसले सर यांनी दिली. शाळा व्यवस्थापन समिती याविषयी मार्गदर्शन केंद्रीय मुख्याध्यापक श्री. भाऊराव तळेकर सर यांनी केले.
“स्वच्छ शाळा, सुंदर शाळा” या अभियानांतर्गत केंद्रामध्ये चांगले काम केल्यामुळे फरतडे वस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरुण चौगुले सर व श्री. राम काळे सर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विश्वकर्मा फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार केंद्रातील श्री. सतीश कळसाईत सर यांना मिळाल्याबद्दल त्यांचाही केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला. ऑनलाइन/ऑफलाइन शिक्षण, स्वच्छ शाळा सुंदर शाळा अशा विविध कामांविषयी केंद्रप्रमुख यांनी माहिती सांगितली. परिषदेसाठी केंद्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, खाजगी शाळांचे ७७ शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. केंद्रशाळा केमचे तुकाराम तळेकर सर यांनी सर्वांचे आभार मानून आपल्या अमोघ वाणीने परिषदेची सांगता केली.



