कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वीचा समतोल ढासळत चालला असून पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने जिथे जागा मिळेल तिथे एकतरी वृक्ष लावला पाहिजे. बकोरीच्या डोंगरावर चंद्रकांत वारघडे हे माहिती सेवा समितीच्या माध्यमातून ५ लाख झाडे देवराई प्रकल्पाअंतर्गत लावण्यात येणार असुन त्यासाठी आजीवन खत व माती देण्याचे आश्वासन वाघोली येथील युवा उद्योजक नटराज सातव पाटील यांनी दिले.
बकोरी, तालुका हवेली येथील डोंगरावर देवराई वनराई प्रकल्पात युवा उद्योजक नटराज सातव यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, नियोजन समिती सदस्य रामकृष्ण सातव, भाजप युवा संघटन सरचिटणीस संदीप आबा सातव, शिवसेनेचे विशाल सातव, पुणे जिल्हा युवा सेना प्रमुख मच्छिंद्र सातव, ओंकार तुपे, गणेश जाधव आदींसह नटराज सातव यांचा मोठा मित्रपरिवार उपस्थित होता.
यावेळी बोलताना नटराज सातव यांनी बकोरी डोंगरावर मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याचा संकल्प व्यक्त करत संकल्प पूर्ण होण्यासाठी आजीवन खत आणि माती देण्याची तयारी दर्शविली तर पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य व वाघोलीचे माजी उपसरपंच रामकृष्ण सातव पाटील यांनी उन्हाळ्यात दररोज झाडांसाठी पाण्याचा टँकर देणार असल्याचे सांगितले. यावेळी वृक्षप्रेमी कडून नटराज सातव पाटील व रामकृष्ण सातव पाटील यांचे आभार मानण्यात आले.




