दोन दिवसांपासून बेपत्ता महिलेची लहान मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
माय मराठी न्युज नेटवर्क

पुणे जिल्ह्यातील आळंदी म्हातोबाची या ठिकाणी दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ३० वर्षीय महिलेने आपल्या दोन वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना शुक्रवार दिनांक १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव कविता देविदास भोसले ( वय- ३० वर्ष रा. भेकराईनगर, मूळ गाव- उमरगा, जि. उस्मानाबाद ) असून प्रणीत भोसले ( वय- २ वर्ष ) असे लहान मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता भोसले ही महिला आपल्या मुलासह मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार कविताच्या नातेवाईकांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार हडपसर पोलीस कविता आणि लहान मुलाचा शोध घेत होते. दोघांचा शोध घेत असताना कविताच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन आळंदी म्हातोबा येथे आढळून आले.
लोणी काळभोर पोलीस आणि हडपसर पोलिसांनी आळंदी म्हातोबाची परिसरात बेपत्ता कविताचा शोध घेतला. यावेळी शोध घेत असताना गायकवाड वस्ती येथील विहिरीत एका महिलेचा मृतदेह शुक्रवारी सहाच्या सुमारास पाण्यावर तरंगत असताना आढळून आला. त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता हा मृतदेह कविता व तिच्या मुलाचा असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी पोहचले असुन पुढील कारवाई सुरु आहे.




