केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील सर्व्हर बंद असल्याचे कारण सांगून ऐन सणासुदीच्या तोंडावर बँकेमधील सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी केम येथील सामाजिक कार्यकर्ते सागर दौंड यांनी हेड ऑफिस पुणे शाखेच्या मा. व्यवस्थापक साहेब यांचे कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, करमाळा तालुका केम शाखेतील अधिकाऱ्यांनी बँकेचे सर्व्हर बंद असल्याचे कारण पुढे करून दि. ०७ सप्टेंबर पासून बँकेतील सर्व व्यवहार बंद केले आहेत. त्यामुळे केम तसेच पंचक्रोशीतील आपल्या बँकेच्या ग्राहकांची गैरसोय झाली आहे. लोकांना सणासुदीचा माल खरेदी करायचा आहे. तसेच, शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे, कीटकनाशके, ओषधे तसेच इतर शेतीपयोगी खरेदी करायची आहे. दुध डेअरीच्या पगारी ही शेतकऱ्यांचा खात्यावर जमा होत आहेत. परंतु, बँकेच्या चुकांमुळे शेतकऱ्यांना गरज असताना आणि खात्यावर रक्कम जमा असतानाही पैसे मिळत नाहीत. या सर्व गोष्टींचा नाहक त्रास विनाकारण शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. नागरिकांना दवाखान्यासाठी पैशाची गरज असताना सलग दोन दिवस बँकेने व्यवहार बंद ठेवले आहेत. याबाबत बँकेमध्ये विचारणा केली असता आमच्याकडे स्टाफ नाही, सर्व्हर बंद आहे अशी उत्तरे या बँकेतील कर्मचाऱ्यांकडून दिली जातात. तरी याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी निवेदनाव्दारे केली आहे.



