माय मराठी न्युज नेटवर्क


बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील सोनसांगवी या गावात एकाच कुटुंबातील सर्वजण रात्री झोपी गेलेले असताना एका सापाने त्या कुटुंबातील तिघांना सर्पदंश केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. तर, त्यांची आई मृत्युशी झुंज देत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, केज तालुक्यातील सोनेसांगवी येथे दीपक साखरे हे आपली पत्नी आणि दोन मुलींसोबत राहतात. दीपक साखरे यांनी मंगळवारी रात्री आपल्या कुटुंबीयासोबत जेवण केल्यानंतर रात्री पत्नी जयश्री साखरे यांच्यासह त्यांच्या ३ व ४ वर्षाच्या दोन मुली असे संपूर्ण कुटुंब झोपी गेले होते. परंतु, रात्री ११ ते १२ वाजेच्या दरम्यान दीपक यांच्या पत्नी जयश्री आणि त्यांच्या दोन मुलींना सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले.
सर्वजण झोपलेले असताना विषारी नागाने घरात प्रवेश करत २ चिमुकल्या मुलींसह त्यांच्या आईला सर्पदंश केला. या दुर्दैवी घटनेत दोन चिमुकल्या मुलींनी आपला प्राण सोडला आहे. तर, आईची मृत्यूशी झुंज सुरू असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही दुर्दैवी घटना उघडकीस येताच, गावात एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित घटनेतील स्वप्नाली दीपक साखरे ( वय-४ वर्षे ) आणि स्वीटी दीपक साखरे ( वय-३ वर्षे ) अशी मृत पावलेल्या चिमुकल्या मुलींची नावे आहेत. तर आई जयश्री दीपक साखरे ( वय-३० वर्षे ) या मृत्यूशी झुंज देत असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार केले जात आहेत. एकाच कुटुंबातील तिघांना सर्पदंश झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदर घटनेनंतर तिघींनाही अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान दोन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आई जयश्री यांच्यावर उपचार सुरू आहेत. एकाच कुटुंबातील तीन जणांना अशाप्रकारे सर्पदंश झाल्याने गावात खळबळ उडाली आहे.




