माय मराठी न्युज नेटवर्क


हरीयाणातील रोहतकमध्ये चार जणांच्या हत्येमागचं रहस्य बुधवारी उघड झाले आहे. रोहतकच्या विजय नगरमध्ये सहा दिवसांपूर्वी प्रॉपर्टी डीलर बबलू पैलवान यांचा २० वर्षीय मुलगा अभिषेक उर्फ मोनू याने कुटुंबातील चार जाणांची हत्या केली होती. वडील प्रदीप मलिक उर्फ बबलू पैलवान (वय ४५), आई बबली (वय ४०) आणि घरी आलेली आजी रोशनी (वय ६०) आणि बहीण नेहा (वय १९) उर्फ तमन्नाच्या डोक्यात गोळी घातली होती. कुटुंबातील एकुलत्या एका मुलाने आपले वडील, आई, बहीण आणि आजीची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या काही साथीदारांच्या मदतीने त्याने या सर्वांची हत्या केली आहे. या हत्येचा सूत्रधार बाहेरचा कुणीच नसून घरातीलच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे.
एक दिवस अभिषेक घरात नसताना हल्लेखोर घरात घुसले आणि सर्वांना त्यांनी गोळ्या घातल्या. कुटुंबातील प्रत्येकाच्या डोक्यात गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेत तिघे जण जागीच ठार झाले होते, तर अभिषेकची बहिण नेहा गंभीर जखमी झाली होती. नेहाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्याचे धागेदोरे पोलिसांना मिळायला सुरुवात झाली.
या हत्याकांडाचे धागेदोरे बाहेर सापडत नसल्यामुळे पोलिसांना अभिषेकवरच संशय आला. घराची चावी बाहेर कशी गेली, याचा शोध घेत असताना पोलिसांना अभिषेकवर संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच अभिषेकने आपला गुन्हा मान्य केला आहे. त्याच्या मित्रांनीच ही हत्या केली असून त्यांच्याकडून पोलिसांना अभिषेकच्या घराची चावी मिळाली आहे. पोलिसांनी अभिषेकला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिषेकच्या वडिलांनी घराची वासरदार म्हणून मुलीचे म्हणजेच नेहाचे नाव लावले होते. ही बाब अभिषेकला मान्य नव्हती आणि घर आपल्याच नावे असावं, यासाठी तो आग्रही होता. त्याशिवाय इतर छोट्या मोठ्या कारणांवरूनही त्याचे घरच्यांशी सतत भांडणं होत होते. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र, प्रॉपर्टीच्या मोहापायी २० वर्षांच्या एकुलत्या एका मुलाने सर्व कुटुंबाची हत्या केल्याच्या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.




