कमला भवानी शुगरचे मिल रोलर पूजन उत्साहात संपन्न
प्रतिनिधी/संजय साखरे


करमाळा तालुक्यातील पांडे येथील कमलाभवानी शुगर लिमिटेड या साखर कारखान्याच्या मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम आज दि.२३/०८/२०२१ रोजी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्री. तानाजी बापू झोळ, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. राजेंद्र बारकुंड व सामाजिक कार्यकर्ते सुजित तात्या बागल यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी कारखान्याचे संस्थापक चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये यावर्षी कारखान्याने विस्तारीकरण केले असून कारखाना दररोज सरासरी सहा हजार मेट्रिक टन ऊस गाळप करणार असल्याचे सांगितले. यावर्षी कारखान्याने आठ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून पाच कोटी युनिट वीज निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चालू गाळप हंगामाच्या दृष्टीने तीनशे वाहनांचे करार पूर्ण झाले असून त्यांना लवकरच ऍडव्हान्स हप्ता वाटप करणार आहे. मागील वर्षी गाळपास ऊस दिलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची बिले दिली असून यावर्षी ही कारखाना शेतकऱ्यांची बिले वेळेवर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री. राजेन्द्र बारकुंड व सुजित तात्या बागल यांची भाषणे झाली.
यावेळी तानाजी बापू झोळ, सुजित तात्या बागल, राजेंद्र बारकुंड, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अशपाक जमादर यांच्यासह कारखान्याचे डायरेक्टर जनरल एच. बी. डांगे साहेब, जनरल मॅनेजर श्री. गिरमे साहेब व सर्व विभागाचे खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.



