-->
क्राईमराज्य

…अखेर ‘ते’ १३ मृतदेह घेऊन रुग्णवाहिकांचा ताफा मध्यप्रदेश कडे रवाना

 

माय मराठी न्युज

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा – मेहकर दुसरबीड या गावानजीक तळेगाव फाट्याजवळ समृध्दी महामार्गाचे काम करणार्‍या १३ मजुरांचा २० ऑगस्ट रोजी अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेले सर्व मजूर हे मध्य प्रदेशातील असून आज या तेराही मजुरांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर या सर्व मजुरांचे मृतदेह घेऊन रुग्णवाहिकांचा ताफा मध्य प्रदेशकडे रवाना झाला आहे. यावेळी मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी आलेल्या नातेवाईकांच्या हंबरड्याने संपूर्ण परिसर शोकाकूल झाला होता.

नागपूर ते मुंबई या समृध्दी महामार्गाचे काम सध्या चालू असून, या कामासाठी मध्य प्रदेशातून निवासी मजूर आणण्यात आले आहेत. गावाकडे काम नसल्यामुळे ते महाराष्ट्रात येऊन कामे करतात. यातील बहुतांश मजूर हे तरुण असून, ते २४ तासाच्या पाळी तत्त्वावर दिवसरात्र काम करत असतात. यातील काही मजूर नेहमीप्रमाणे गुरुवारी साइटवर काम करण्यासाठी गेले होते. शुक्रवारी ते कामावरुन परत येत असताना राहत्या ठिकाणी टिप्परने जात होते. मात्र, त्याचवेळी या लोखंडी सळ्या घेऊन जात असलेल्या टिप्परचा भीषण अपघात झाला आणि होत्याचे नव्हते झाले. कॅम्पमधील इतर सहकार्‍यांना याचा जबर धक्का बसला. टिप्परमध्ये असलेले १५ मजूर आणि एक लहान मुलगी लोखंडी सळ्या खाली दबले गेले होते. यावेळी आसपासच्या बहुतांश नागरिकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला होता. परंतु, पावसामुळे यात अनेक अडचणी आल्या होत्या.

या सर्व मजुरांचे मृतदेह जालना येथील रुग्णालयात ठेवण्यात आले होते. आज त्या मजुरांचे नातेवाईक आल्यानंतर प्रत्येकाची ओळख पटविली. त्यानंतर या सर्वांचे शवविच्छेदन करण्यात आले. मृत १३ मजुरांपैकी ८ मजूर हे खरगोन जिल्ह्यातील आहेत तर ५ मजूर धार जिल्ह्यातील रहिवासी आहेत. जालना येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर हे १३ मृतदेह घेऊन रुग्णवाहिकांचा ताफा मध्य प्रदेशकडे रवाना झाला आहे. यावेळी गावाकडून आलेले मृतांचे नातेवाइक, मध्य प्रदेश सरकारचे नायब तहसीलदार, पोलिस प्रशासन उपस्थित होते. सदर रुग्णवाहिकेची व्यवस्था ही संबंधित कंपनीने जालना येथून केली असून, त्या औरंगाबादमार्गे चाळीसगाव येथून बर्‍हाणपूर येथे त्यांच्या गावात पोहोचणार आहेत. या सर्व मजुरांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मध्य प्रदेश प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close