-->
करमाळाराजकिय

पाटील गटाच्या प्रवक्त्यांनी वायफळ बडबड थांबवावी; तळेकर यांच्या टीकेला विनय ननवरे यांची प्रतिक्रिया

 

करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

देशभरात अनेक राजकीय पक्ष आहेत आणि त्या पक्षांचे प्रवक्ते आपल्या पक्षाची अधिकृत भूमिका माध्यमांसमोर, लोकांसमोर मांडत असतात. करमाळा तालुक्यात मात्र काही नेतेमंडळींना पक्षांपेक्षा आपल्या गटाची प्रगती करण्यामध्ये मोठी धन्यता वाटते. अशाच एका गटाचे ( पाटील ) प्रवक्ते हे गेल्या 2-3 दिवसात वायफळ बडबड करून आपल्या अकलेचे तारे निष्कारण तोडत आहेत. यामुळे मतदारसंघाचे स्वास्थ्य मात्र बिघडत आहे. त्यामुळे त्यांनी ही वायफळ बडबड तात्काळ थांबवावी. असा सल्ला बोरगावचे युवा नेते व धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विनय (काका) ननवरे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की, मागील दोन दिवसापासून सुनील तळेकर हे आ. संजयमामा शिंदे यांच्यावरती राजकीय द्वेषातून, बिनबुडाचे आरोप करत आहेत. संजयमामा शिंदे यांच्यामुळे करमाळा तालुक्यात लसीकरणात विस्कळितपणा आला, अनेक लोक लसीपासून वंचित राहिले असे हास्यास्पद दावे ते करत आहेत. यापुढे जाऊन करमाळा तालुक्यात लसीकरण कमी व माढा तालुक्यात जास्त अशी आकडेवारी दाखवून ते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे याकडे विनय ननवरे यांनी लक्ष वेधले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, माढा मतदारसंघांमध्ये उपळाई बुद्रूक, मानेगाव, रोपळे, पिंपळनेर, आलेगाव, टेंभुर्णी व मोडनिंब ही 7 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तर कुर्डुवाडी व माढा या ठिकाणी 2 ग्रामीण रुग्णालय आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात त्या त्या संस्थेसाठी शासनाने लसीचा कोटा हा ठरवून दिलेला आहे. त्यामुळे माढा तालुक्याला अधिक लस मिळते. करमाळा तालुक्यामध्ये या तुलनेत केम, कोर्टी, जेऊर, साडे, वरकुटे ही 5 प्राथमिक आरोग्य केंद्र व 1 उपजिल्हा रुग्णालय आहे, त्यामुळे आपल्याकडे लस कमी मिळालेली दिसते.

प्रत्येक मतदारसंघांमध्ये दर आठवड्याला मिळणार्‍या लसीचे प्रमाणही कमी अधिक असते. बंद पडत चाललेल्या गटांच्या प्रवक्त्यांनी ज्या दिवसाची आकडेवारी दिलेली आहे. त्यादिवशी करमाळा तालुक्याला लस कमी होती हे खर आहे. परंतु करमाळा तालुक्यांमध्ये जेऊर, वाशिंबे तसेच चिखलठाण आणि कंदर या ठिकाणी लसीकरण शिबिरे झाली होती. त्यादिवशी हजारोंच्या संख्येने आपल्या तालुक्यामध्ये लसीकरण झालेले दिसते. ही आकडेवारी सर्व वर्तमानपत्रांमधूनही प्रसिद्ध झालेली आहे. असे असताना विनाकारण आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन करून, लोकांची दिशाभूल करून, हीन पातळीवरचे राजकारण करणाऱ्या पाटील गटांच्या प्रवक्त्यांनी आपली वायफळ बडबड थांबवावी व राजकारणविरहित पद्धतीने करमाळा तालुक्यात अधिकाधिक लसीकरण करण्यासाठी आ. संजयमामा शिंदे सक्रिय आहेत तर त्यांना सहकार्य करावे अशी अपेक्षाही श्री. ननवरे यांनी व्यक्त केली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close