केम प्रतिनिधी / संजय जाधव


करमाळा तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या केम गावात सध्या कोरोनाचे रुग्ण नसताना देखील येथील व्यापाऱ्यांवर लागु करण्यात आलेले निर्बंध मागे घेण्यात यावेत. अशी मागणी केम व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सागर दौंड, उपाध्यक्ष सागर राजे तळेकर, सचिव येवले यांनी करमाळा तहसिलदार यांचे कडे लेखी निवेदन देऊन केली आहे.
सदर निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे कि, सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने ही साखळी तोडण्यासाठी मा. जिल्ह्याधिकारी मिलींद शंभरकर साहेब यांनी करमाळा, माढा, पंढरपूर सांगोला, माळशिरस या पाच तालुक्यांत दि. १३ पासून कडक निर्बंध लागू केले आहेत. परंतु केम गावात सध्या कोरोनाचे रूग्ण नाहीत. तरी देखील केम येथील व्यापाऱ्यांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. एक तर गेल्या वर्षभरापासून लाॅकडाऊन असल्यामुळे दुकानदारांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. दुकानदार आर्थिक संकटात सापडले आहेत. दुकानदारांना दुकानाचे भाडे, कामगारांचे पगार देण्यासाठी सुध्दा पैसे नाहीत. बँकेचे कर्ज घेतलेला हप्ता भरता येत नाही. अशी परिस्थीती झालेली असताना आता सणा- सुदिचे दिवस आले आहेत. दुकानदारांनी भरलेला माल ही कोरोना निर्बंधांमुळे विकता येत नाही.
दुकानदारांवर यामुळे आता भिक मागण्याची वेळ येत आहे की काय? असे दुकानदार बोलू लागले आहेत. तरी या सर्व बाबींचा विचार करून केम साठी शिथीलता द्यावी. अशी मागणी सागर तळेकर यांनी तहसीलदारांकडे निवेदनाव्दारे केली आहे.




