माय मराठी न्युज नेटवर्क


महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट चालू असतानाच आता नवीन झिका या नविन व्हायरसचे संकट आले आहे. पुणे जिल्ह्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हा प्रशासनाने पुणे जिल्ह्यातील ७९ गावांमध्ये झिका या व्हायरसचा प्रादुर्भाव झाला असल्याची शंका व्यक्त केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ७९ गावांची नावे प्रसिद्ध केल्यानंतर या गावांमध्ये आरोग्य विभागाने आपत्कालीन सुविधांसाठी तयारी सुरू केली आहे. पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि यानंतर सर्व ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाला अलर्ट करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील बेलसरमध्ये काही दिवसांपूर्वी झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर ४१ जणांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. या ४१ जणांपैकी २५ लोकांना चिकनगुनिया तर ३ जणांना डेंग्यूची लागण झाली होती. तर एका ५० वर्षाच्या महिलेला झिका विषाणूची लागण झाली होती. या ७९ गावांमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनिया सारखे आजार आढळले तर हे आजार झिका व्हायरसच्या दृष्टीने संवेदनशील मानले जाणार आहेत. डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजाराचे रुग्ण आढळले तर त्यांच्या रक्तांचे नमुने घेऊन त्या रुग्णांची झिका संक्रमणाची चाचणी केली जाणार आहे.
पुणे जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेली तालुकानिहाय अतिसंवेदनशील गावे:-
जुन्नर- आनंदवाडी, पिंपळवंडी, राजुरी, ओतूर, येणेरे, काळदरी.
खेड- राजगुरुनगर शहर, शिरोली, पांडूरंगनगर, भोसे, मरकळ, आळंदी, निघोजे, मोई, गोसासी, मेदनकरवाडी.
आंबेगाव- घोडेगाव.
शिरूर- वढूबुद्रूक, सादलगाव, मांडवगण फराटा, गारमाळ.
दौंड- दौंड शहर, कुरकुंभ, बेर्डी, होलारवस्ती, समतानगर, हिंगणी.
इंदापूर- निमगाव केतकी, शेळगाव, यादववाडी, कुरवली, माळवाडी, तक्रारवाडी, भादलवाडी.
हवेली- खेड, देहू, थेऊर, नांदेडफाटा, नऱ्हे, कोंढवे-धावडे, उत्तमनगर, शिवणे, खानापूर, मणेरवाडी, वाघोली, कोळवडी, मांजरी बुद्रूक, केशवनगर, उरुळीकांचन, शिंदवणे, कोरेगाव मूळ, खामगाव टेक, पिंपरीसांडस.
वेल्हे- करंजावणे, खामगाव क्षेत्र, ओसाडे, साखर, आंत्रोली.
मुळशी- माण, सूस.
बारामती- तरडोली, सुपा, काळखैरेवाडी, मोरगाव, सटवाजीनगर, अंबराई, आनंदनगर, तांदूळवाडी, माळेगाव विद्यानगर, सूर्यनगरी, कटफळ.
पुरंदर- बेलसर, भोर, सासवड, ढुमेवाडी, पारगाव, सुपे खुर्द, जेजुरी, भुतोंडे, चिखलावडे, वाठार, नीरा.
झिका व्हायरस हा एडीज या मच्छरांमुळे पसरतो. हे मच्छर डेंग्यू आणि चिकनगुनिया सारखे गंभीर आजार पसरवतात. झिका व्हायरसचे संक्रमण करण्यासाठी हे मच्छर जबाबदार आहेत. त्यामुळे झिका व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.




