-->
करमाळासामाजिक

दूध पावडर ला प्रति किलो ५० रुपये प्रमाणे निर्यात अनुदान द्या

पशुखाद्य अनुदान म्हणून प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करा

 

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

राज्यात ३५ हजार मेट्रिक टन दूध पावडर शिल्लक असून ही पावडर निर्यात करण्यासाठी पन्नास रुपये प्रति किलोप्रमाणे अनुदान दिल्यास दुधाचे पाच रुपये प्रति लिटर प्रमाणे दर वाढतील. त्यासाठी राज्य शासन कोणतेही प्रयत्न करत नाही अशी खंत नेचर डेरी चे चेअरमन अर्जुन देसाई यांनी व्यक्त केली. दुधाला दरवाढ द्यावी या मागणीसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी अभिमान वीर, बापू बर्डे, घारगाव चे चेअरमन भोगल बापू, युवराज भोसले, संजय तोरमल, युवराज गपाट, औदुंबर शेळके यांनी कळस येथील नेचर डेरीच्या कार्यालयात जाऊन निवेदन दिले. यावेळी नेचर डेअरीचे कार्यकारी संचालक एम.पी. सिंग, मयूर दादा देसाई, एस.एन पटेल आदी संचालक उपस्थित होते.

यावेळी बोलताना अर्जुन देसाई म्हणाले की, महाराष्ट्र शेजारील कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे शासन अनुदान जमा करते मात्र महाराष्ट्रात हे होत नाही. शिवाय सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर कोसळले असून जोपर्यंत पावडरचा साठा संपत नाही तोपर्यंत दूध प्रकल्पांचे आर्थिक गणित सुटणार नाही. दूध प्रकल्पांचे आर्थिक गणित अडकले की दुधाला कमी दर द्यावा लागतो.

यावेळी बोलताना महेश चिवटे यांनी दुधाला प्रति लिटर तीस रुपये प्रमाणे शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे. तीस रुपये लिटर दुधाला भाव मिळाला तरच दूध उत्पादन धंदा नफ्यात येऊ शकतो अन्यथा दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. यामुळे महाराष्ट्र शासनानेही तात्काळ या प्रश्नासंदर्भात दूध दराची कोंडी फोडावी. दूध पावडरला निर्यात अनुदान ५० रुपये प्रति किलोप्रमाणे द्यावे व दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पशुखाद्य अनुदान म्हणून प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे रक्कम जमा करावी. अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.

सध्या पशुखाद्याच्या किमती गतवर्षीपेक्षा दुपटीने वाढले असून गतवर्षी १५ रुपये किलो असणारी सरकी पेंड ३५ रुपये किलो झाली आहे. पशुखाद्याच्या दरवाढीचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे तर दुसरीकडे दुधाचे दर उतरत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढाकार घेतील अशी आशा दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close