केम प्रतिनिधी


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या केम टेंभूर्णी एस टी गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. केम हे गाव करमाळा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले गावं असून या गावात कुंकाचे कारखाने, माध्यमिक शाळा, राष्ट्रीयकृत बँका आहेत. तसेच या गावात विद्यार्थी, नोकरदार व व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पुणे, सोलापूर, अकलूज, पंढरपूर आदि ठिकाणी कामासाठी जावे लागते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव ही कमी होत आला आहे. सध्या एस टी गाड्या बंद असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. पुणे सोलापूर ला जायचे म्हटले तर कंदर किंवा टेंभूर्णी ला मोटार सायकलवर कोणाला तरी घेऊन जावे लागत आहे. त्यासाठी पेट्रोल शंभर ते दीडशे रूपयांचे लागते. त्यानंतर टेंभूर्णी हून सोलापूरला १६० किंवा १२० रूपये तिकिट भाडे हे ज्या त्या गाड्यांवर अवलंबून आहे. टेंभुर्णीला रात्री अपरात्री आल्यानंतर मोटर सायकल बोलावून घ्यावी लागते. त्यामध्ये पेट्रोलसाठी पैसे द्यावे लागतात. म्हणजे सोलापूरला जायचे यायचे म्हटले तर सहाशे रूपये मोजावे लागतात. टेंभूर्णी केम एस टी सुरू केल्यास प्रवाशांची गैरसोय होणार नाही. तसेच भाडे ही कमी लागेल. ज्या सर्वसामान्य लोकांकडे मोटार सायकल नाही त्यांची मात्र टेंभूर्णी, कंदरला गेल्यानंतर रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या मोटार सायकलस्वरांना हात करावा लागतो. कोरोनामुळे कोणी कोणाला गाड्यांवर ही घेत नाहीत. मग तासन् तास बसून एखाद्याला विनवणी करून यावे लागते. कोरोनामुळे रेल्वे बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. रेल्वेला भाडे कमी असते. रेल्वे म्हणजे गरिबांचा रथ आहे आणि हा रथ बंद असल्यामुळे नागरिकांना पुणे सोलापूरला जाण्यासाठी दुप्पट भाडे जाऊनही हाल होत आहेत. तरी कुर्डुवाडी आगाराने केम दहिवली मार्गे टेंभूर्णी एस टी पूर्वींप्रमाणे सुरू कराव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.



