माय मराठी न्युज नेटवर्क


केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जवळपास ७०० कोटी रुपयांची मदत मंजूर केली असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुराचा फटका अनेक भागातील शेतीलाही बसला आहे. पुराचे पाणी शेतात घुसल्याने पिके वाहून गेली आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही मदत जाहीर केली आहे. नरेंद्र सिंह तोमर यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत ७०१ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना ही मदत पीक विमा योजनेअंतर्गत दिली जाईल, असंही नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.
महाराष्ट्र सरकारनं नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर जी माहिती केंद्राला दिली गेली. त्यावर केंद्राने आंतरमंत्रालयीन समिती बनवली, त्या समितीनं राज्यातील अधिकाऱ्यासोबत दौरा केला. त्या दौऱ्याचा अहवाल गृहमंत्र्यांना देण्यात आला. तो अहवाल मंजूर केल्यानंतर महाराष्ट्रासाठी ७०१ कोटी रुपये देण्याचा निर्णय झाल्याचं नरेंद्र तोमर म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात कोकण, सातारा, सांगली, कोल्हापूर मध्ये पावसाचा जोर होता. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर शहरात पाणी शिरलं होतं. नद्यांनी धोक्याची पाणी पातळी ओलांडली होती. यामध्ये कित्येकाचं मोठं नुकसान झाल आहे. त्यामुळे सध्या सगळेच पूरग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.



