माय मराठी न्युज प्रतिनिधी


नांदेड जिल्ह्यात आज सकाळी ०८ वाजून ३३ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अर्धापूर तालुक्यात आणि नांदेड शहरातील तरोडा नाका, सांगवी अशा अनेक भागात जमीन हलल्याचे जाणवले. मात्र कुठेही नुकसान झालं नसल्याची माहिती आहे. मात्र भूकंपाचा धक्का असल्याचे जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नांदेडचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील साधूनगर येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असून त्याची तीव्रता आपल्याकडे फारशी नसली तरीही प्रशासनाकडून काळजी घेण्यात येेेत असल्याचे सांगितले. या भुुकंपाची तीव्रता ४.४ रिश्टर स्केल असल्याचे National center of seismology च्या संकेत स्थळावरून निदर्शनास येत आहे.
हिंगोली वसमत मध्ये जमीन हादरली. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, वसमत, औंढा व कळमनुरी तालुक्यातील अनेक गावात सकाळी ०८:३० वाजता जमीन हादरली तर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे याच वेळात एकापाठोपाठ एक असे दोन आवाज झाले. यामुळे नागरिक भयभीत झाले. वसमत तालुक्यासह हिंगोली जिल्हाभरात आज सकाळी ०८:३० वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. वसमत तालुक्यातील गुंज, पांगरा शिंदे, शिवपुरी, टाकळगाव, रांजणगाव, गिरगाव, कुरुंदा, म्हातारगाव, महागाव, बोराळा, डोनवाडा, सेलू या गावांसह अनेक गावात हे धक्के जाणवले.




