केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथे कोरोना काळातील तिसरे भव्य रक्तदान शिबिर पार पडले. सदर रक्तदान शिबिरात ५ महिला, १ अपंगासह ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. केम गावचे सुपुत्र जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या व माजी सरपंच किंगमेकर अजित दादा तळेकर यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन हे रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री. उत्तरेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या शिबिरात ५ महिलांनी रक्तदान केले. यामध्ये करमाळा तालुका शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा वर्षाताई चव्हाण यांनी ही रक्तदान केले.
यावेळी उत्तरेश्वर रक्तदाते संघटना अध्यक्ष भैरु शिंदे यांनी रक्तदानाचे महत्व सांगताना म्हणाले की, कोरोना काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व किंगमेकर अजित दादा तळेकर यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन हे रक्तदान शिबिर आयोजित केले. रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान असुन आपल्या एक बाटली रक्ताने तीन जीव वाचतात.
यावेळी वर्षाताई चव्हाण म्हणाल्या की, केम येथील श्री. उत्तरेश्वर रक्तदाते संघटनेचे काम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले. येथून पुढे केम गावातील महिलांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले.
या रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे संघटनेचे सचिव दत्ता कुलकर्णी या दिव्यांग रक्तदात्याने आतापर्यंत ४० वेळा रक्तदान करून एक आदर्श निर्माण केला आहे.
या रक्तदान शिबिरासाठी भैरु शिंदे, गणेश शेटे, दत्ता कुलकर्णी, अण्णा मोरे, खंडू शेठ वासकर, दत्तात्रय देवकर, महेश ससाणे, सचिन जाधव, यांनी परिश्रम घेतले. शेवटी या सर्व रक्तदात्यांचे आभार रक्तदात्या पुजा धर्माधिकारी यांनी मानले. तसेच यावेळी मंजुळा पळसकर, राणी तळेकर, आशा मोरे व अन्य रक्तदाते उपस्थित होते.



