-->
करमाळाराजकिय

पाटणे यांना प्रभारी सचिव करण्याचा ठराव संमत; मात्र सचिव पदाचा वाद अजूनही कायम…

 

 

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

आज करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदाचा पदभार राजेंद्र पाटणे यांना देण्याचा ठराव बहुमताने संमत झाला. मात्र सेवाजेष्ठतेने पदभार स्विकारलेले क्षीरसागर यांनी मी चार्ज देणार नसल्याचे सांगितल्याने अजूनही सचिव पदाचा वाद कायम आहे. अतिशय रंगत झालेल्या या निवडीचा निकाल बाहेर येताच करमाळा शहर परिसरात फटाक्यांची आतषबाजी आणि जल्लोष करण्यात आला.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुनील शिंदे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर शिंदे यांनी प्रभारी सचिव पदाचा चार्ज क्षिरसागर यांच्याकडे दिला होता. यावरून राज्य पणन संचालक, पुणे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पणन संचालक सतीश सोनी यांनी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांना बाजार समितीचे नियंत्रक अधिकारी म्हणून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर यांनी सभेच्या प्रभारी सचिवपदाचा निर्णय घेण्यासाठी मंगळवार, दि. २९ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा उपनिबंधक श्री. कुंदन भोळे यांच्या निरीक्षणात संचालक मंडळाची बैठक बाजार समितीच्या सभागृहात बोलावली होती.

सभेचे अध्यक्ष श्री. बंडगर यांनी सचिव पदासाठी श्री. राजेंद्र पाटणे यांचे नाव सुचविले असता त्याला जगताप गटाकडून विरोध करण्यात आला. त्यामुळे सदर निवडी साठी मतदान करण्याचे ठरले असता जगताप गटाकडून ८ व बागल गटाकडून ८ संचालकांनी मतदान केले. यात सभापती प्रा. शिवाजी बंडगर यांनी पाटणे यांच्या बाजूने निर्णायक मत दिले. बैठकीत जिल्हा उपनिबंधक यांनी पणन कायद्यातील तरतुदी, सेवानियम, सेवाजेष्ठता सविस्तर सांगून प्रोसेंडींगला लेखी मत नोंदविले. ठरावाच्या बाजूने दिग्विजय बागल, सभापती प्रा.शिवाजी बंडगर, उपसभापती चिंतामणी जगताप, आनंद ढेरे, वालचंद रोडगे, सरस्वती केकाण, रंगनाथ शिंदे, अमोल झाकणे यांनी तर ठरावाच्या विरोधात जयवंतराव जगताप, चंद्रकांत सरडे, सदाशिव पाटील, दत्तात्रय रणसिंग, शैला लबडे, विजय गुगळे, मयूर दोशी, औदुंबर मोरे या १६ पैकी ९ संचालकांनी पाटणे यांच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे बाजार समितीच्या प्रभारी सचिव पदाचा पदभार श्री. पाटणे यांच्या कडे हस्तांतरित करण्यात यावा असे ठरले.

 

सचिव पदाचा वाद मात्र कायमच

 

प्रभारी सचिव पदाचा ठराव पाटणेंच्या बाजूने संमत झाला आहे पण क्षीरसागर हे पदभार न देण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. सेवाजेष्ठतेने पदभार स्विकारलेले क्षीरसागर यांनी आपण पणन संचालक मंडळ यांचेकडे दाखल केलेले अपील अजून प्रलंबीत असून सदरची बाब ही अजून न्याय प्रविष्ठ आहे. आजचा संचालक मंडळाचा ठराव हा बेकायदेशीर असून कर्मचारी सेवा नियमांचा भंग करणारा असल्याने मी अपिलात जाऊन योग्य निर्णय झाल्याशिवाय चार्ज देणार नसल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. त्यामुळे सध्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीतील सचिव पदाचा वाद अजून कायम असल्यामुळे आता यात पुढे नक्की काय होईल याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close