आरोग्यविषयक- पाणी म्हणजे काय?? वाचा पाण्याचे महत्त्व..
तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला ? पाणी म्हणजे काय हे माहीत नसलेली व्यक्ती सापडणे अशक्य आहे. पाणी हेच जीवन आहे.


पाण्यासाठीच माणूस मैलोनमैल वणवण भटकत असतो. पाणी नसेल तर आपल्या तोंडचे पाणी पळते. रासायनिक दृष्ट्या पाणी म्हणजे अर्थात हायड्रोजनचे दोन अणू व ऑक्सिजनचा एक अणू यांचे संयुग. पाण्याला कोणताच रंग नसतो, वास नसतो आणि पाण्याच्या स्रोतानुसार विशिष्ट चव असते. पाणी असेल तर आणि तरच मानवी संस्कृतीचा विकास होतो. कारण पिण्यासाठी शेतीसाठी व उद्योगधंद्यासाठी पाणी आवश्यक असते. असे हे बहुगुणी पाणी शरीरात तर ६३ टक्के पाणीच असते.
पाण्याची दुसरी बाजू पाहणेही महत्त्वाचे ठरेल. प्रदूषित पाण्यामुळे माणसाला अनेक रोग होऊ शकतात. जीव जंतू, अनेक विषारी रासायनिक पदार्थ, किरणोत्सारी पदार्थ इत्यादींमुळे पाण्याचे प्रदूषण होते. यामुळे टायफाईड, कावीळ, हगवण, कॉलरा आदी रोग किंवा विषबाधा होऊ शकते. किरणोत्सर्गी पदार्थांमुळे कर्करोग होऊ शकतो. नुसते पाहून पाणी शुद्ध सुरक्षित आहे वा नाही हे ठरवता येत नाही. स्वच्छ दिसणाऱ्या पाण्यात सूक्ष्म विषाणू किंवा रासायनिक पदार्थ किरणोत्सर्गी पदार्थ असू शकतात. यामुळे विविध रोग होऊ शकतात. यासाठी पाणी शुद्ध आहे वा नाही हे तपासण्यासाठी त्याच्या प्रयोगशाळेत तपासण्या कराव्या लागतात.
प्रयोगशाळेत पाण्याची भौतिक रासायनिक व जैविक तपासणी केली जाते. या तिन्ही तपासण्यात जे पाणी सुरक्षित सिद्ध होईल तेच पाणी पिण्यास योग्य असते. सर्वसामान्यपणे पाण्याचे जैविक परीक्षण केले जाते. कारण रासायनिक तपासण्यांना जास्त वेळ लागतो. क्लोरिन, ब्लिचिंग पावडर आदींचा वापर करून पाणी जैविक दृष्ट्या शुद्ध करता येते. अगदी घरच्या घरीही क्लोरीनच्या गोळ्या व द्रावण वापरून पाणी शुद्ध करता येईल. पाणी हे जीवन असले तरी दूषित पाणी दरवर्षी लाखो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत होत असते. त्यामुळे पाण्याचे शुद्धीकरण फार महत्त्वाचे आहे.
Cp




