-->
करमाळामाहिती विषयकराजकिय

अकलूजच्या आर.टी.ओ. अधिकारी गायकवाड यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करा- कोळेकर

 

प्रतिनिधी/मच्छिंद्र वाघमारे

 

अकलूज उपप्रादेशिक परिवहन खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. या ठिकाणच्या अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या समन्वयाने त्यांचे चालक श्री. मखरे तसेच अश्विनकुमार पोंदवुले, संभाजी गावडे, संदीप पाटील, वैभव राऊत हे चार मोटार वाहन निरीक्षक आणि खाजगी असे ३० लोक यांच्यामार्फत अकलूज कार्यक्षेत्रात येणाऱ्या विशिष्ट रक्कम ठरवून वसुली केली जाते. त्यामुळे या सर्वांची खातेनिहाय चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन जनशक्ती संघटनेचे बाबाराजे कोळेकर यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

या दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, अकलूज येथील आर.टी.ओ. कार्यालयातील होणाऱ्या भ्रष्टाचारासंदर्भात दोन महिन्यापूर्वी निवेदन देऊन देखील याबाबत आपण कोणतीच कारवाई केली नसल्याने सदर स्मरण पत्र दिले आहे. अकलूज आरटीओ कार्यालयाकडून अनेक शेतकरी, वाहन मालक, चालक यांच्याकडून पैसे घेत असल्यासंदर्भात तक्रारी आमच्या संघटनेकडे प्राप्त झाल्या असून जड वाहतूक करणाऱ्या २७०० वाहनधारकांकडून प्रति महिना प्रति वाहन रु.२५००/- याप्रमाणे ६७ लाख ५० हजार रुपये, महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डर वरून येणाऱ्या मंगळवेढा-मरवडे रोडवर २४ तास चेक पोस्ट च्या नावाखाली, अकलूज कार्यक्षेत्रात ६ ठिकाणी कॅम्प घेतले जातात. माढा, कुर्डूवाडी, टेंभुर्णी, सांगोला, करमाळा, मोडनींब या ठिकाणी प्रत्येकी वेगवेगळ्या कारणातून वसुली केली जाते.

 

अशी सर्व आकडेवारी कोळेकर यांनी सदर निवेदनामध्ये सविस्तर पद्धतीने दिली असून कशा प्रकारे भ्रष्टाचार केला जातो. त्याच्यातून किती रुपयांची माया गोळा केली जाते, याची पोलखोल त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे गायकवाड यांच्यावर कोणत्याही परिस्थितीत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

…अन्यथा ‘जनशक्ती’च्या स्टाईलने आंदोलन करू

अकलूज येथील आरटीओ कार्यालयामध्ये अधिकारी गायकवाड यांच्या संगनमताने वेगवेगळ्या प्रकारे मोटर चालक व वाहक यांची लूट केली जाते. यासंदर्भात बाबाराजे कोळेकर यांनी दिलेल्या निवेदनात कशा प्रकारे व किती रकमेची लूट केली जाते हे सविस्तर सांगितले आहे. त्यामुळे गायकवाड यांची खातेनिहाय सखोल चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा जनशक्ती स्टाईलने पुणे आरटीओ कार्यालयावर आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी.

-अतुल खूपसे-पाटील अध्यक्ष, जनशक्ती संघटना

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close