
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


युवा समाजसेवक व यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांच्या समाजकार्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारतीय डाक विभागाने त्यांचे टपाल तिकीट प्रसिद्ध केले आहे. वसंत महोत्सव २०२५ या औचित्याने या तिकीटाचे अनावरण भारताचे प्रसिध्द संशोधक व मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख यांच्या हस्ते झाले.
या सोहळ्यास अक्कलकोट स्वामी देवस्थानचे विश्वस्त भारतराव शिंदे-पाटील, डॉ. इंदिरा पाटील, डॉ. महेंद्र पाटील, प्रा. बाळकृष्ण लावंड, राजकुमार दोशी, दिलीप तळेकर, अमित देशमुख तसेच शेकडो शिक्षणप्रेमी उपस्थित होते.
प्रा. करे-पाटील यांनी राष्ट्रपतींचे विज्ञान सल्लागार श्रद्धेय स्व. वसंतराव दिवेकर यांच्या प्रेरणेने यशकल्याणी सेवाभावी संस्था स्थापन करून मागील अकरा वर्षांपासून ग्रामीण भागात शैक्षणिक, सामाजिक व वैज्ञानिक चळवळींना चालना दिली आहे. शिक्षक सक्षमीकरण शिबिरे, आदर्श शिक्षक गौरव, विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, विज्ञान कार्यशाळा, मानसिक व भावनिक विकासासाठी समुपदेशन अशा विविध उपक्रमांद्वारे त्यांनी सामाजिक परिवर्तनाचे कार्य केले आहे.
यापूर्वी अण्णा हजारे, आयपीएस विश्वास नांगरे-पाटील, नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने, ग्लोबल टीचर रणजीत डिसले, राष्ट्रपती पुरस्कार विजेते विक्रम अडसुळ आणि विधीज्ञ अविनाश गोखले यांच्या कार्याचीही दखल घेऊन भारतीय डाक विभागाने टपाल तिकीट प्रसिद्ध केले होते.
> “युवा समाजसेवक प्रा. गणेश करे-पाटील यांचे समाजकार्य दिशादर्शक व प्रेरणादायी आहे. भारतीय टपाल विभाग समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महान व्यक्तींना टपाल तिकीटाद्वारे सन्मानित करत असतो.”
— अमित देशमुख, उपविभागीय डाक निरीक्षक, कराड उपविभाग, जि. सातारा



