-->
करमाळाराजकिय

“आरोप सिद्ध करा, सुभाष चौकात सत्कार करू!”– संजयमामा समर्थकांचे सुनील तळेकरांना थेट आव्हान

 

करमाळा | प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)

 

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यातील राजकारण तापले आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केलेले आरोप हे पूर्णतः खोटे, बिनबुडाचे आणि राजकीय द्वेषातून केलेले असल्याचा आरोप संजयमामा समर्थक उदयसिंह खाटमोडे पाटील यांनी केला आहे. विद्यमान आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केलेले आरोप पुराव्यांसह सिद्ध करून दाखवावेत, अन्यथा जनतेची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागावी, असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे.

 

खाटमोडे पाटील म्हणाले की, संजयमामा शिंदे यांच्या कार्यकाळात करमाळा तालुक्याला ऐतिहासिक विकास निधी मिळाला असून त्या निधीचा जाहीरनामा आम्ही जनतेसमोर मांडला आहे. आज तालुक्यात दिसणारी विकासकामे ही मामांच्या कार्यकाळातील दूरदृष्टीचे परिणाम आहेत. मात्र विद्यमान आमदारांच्या काळात जनतेला नेमकी कोणती ठोस विकासकामे मिळाली, हा खरा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.

 

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या व एकहाती सत्ता असतानाही सध्या बंद अवस्थेत असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याबाबत काहीही भूमिका न घेता माजी आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणे ही जनतेची दिशाभूल करण्याची खेळी असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पाटील गटाने माजी आमदारांवर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवाव्यात असा सल्लाही त्यांनी दिला आहे.


“आरोप सिद्ध करा, नाहीतर माफी मागा”
        पाटील गटाने संजयमामा शिंदे यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप जर एकाही पुराव्यासह सिद्ध झाले, तर करमाळा शहरातील सुभाष चौकात सुनील तळेकर यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येईल. मात्र आरोप सिद्ध न झाल्यास जनतेसमोर जाहीर माफी मागण्याची तयारी पाटील गटाने ठेवावी, असा आक्रमक इशाराही खाटमोडे पाटील यांनी दिला आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close