-->
करमाळाविशेष

एक लाखांहून अधिक वारकऱ्यांसह संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल; रावगाव येथे जल्लोषात स्वागत

रांगोळीच्या पायघड्या, ढोल-ताशांचा गजर, उंट व जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी; प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी उत्कृष्ट सुविधा

 

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

 

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून २० दिवसांमध्ये सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करत संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू संतश्रेष्ठ श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी शनिवारी एक लाखांहून अधिक वारकऱ्यांसह सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली. जिल्ह्याच्या सीमेवरील करमाळा तालुक्यातील रावगाव येथे पालखीचे अत्यंत भक्तिमय वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

 

अहिल्यानगर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होताच रांगोळीच्या पायघड्या, ढोल-ताशांचा गजर, हलगी-लेझीमचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी, चार उंट आणि दोन जेसीबीच्या साहाय्याने करण्यात आलेली पुष्पवृष्टी यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. सोलापूर जिल्हा प्रशासन, करमाळा तालुका प्रशासन आणि रावगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

‘माऊली… माऊली…’ आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात हजारो भाविकांनी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. रावगावसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने स्वागतासाठी उपस्थित होते. पालखीचे आगमन होताच संपूर्ण परिसरात भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यंदाच्या पालखी सोहळ्यात ६१ दिंड्या सहभागी असून एक लाखांहून अधिक वारकरी पायी वारी करत आहेत. पालखीच्या रथासोबत चार अश्व आणि दोन बैलजोड्या आहेत.

 

यावेळी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष राहुल महाराज साळुंखे, पालखी प्रमुख माधव महाराज राठी, पालखी चालक नवनाथ महाराज गांगुर्डे, श्रीपाद महाराज कुलकर्णी, बेलापूरकर महाराज, माजी अध्यक्षा कांचनताई जगताप आणि जयंत महाराज गोसावी यांचाही जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन व रावगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 

पालखीच्या स्वागत सोहळ्यास प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा, तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक रणजीत माने, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, मनोज राऊत तसेच रावगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वारकऱ्यांसाठी प्रशासनाची चोख व्यवस्था

आरोग्य विभागाकडून मोफत आरोग्य तपासणीसह ईसीजी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले.

पोलीस, आरोग्य विभाग आणि महावितरण यांच्यात समन्वय राहावा यासाठी स्वतंत्र आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आला.

ग्रामपंचायतीकडून मोफत मसाज सेवा, चप्पल दुरुस्ती, कपड्यांची इस्त्री, मोबाईल चार्जिंग, तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्नानगृह आणि स्वच्छतागृह उभारण्यात आले.


वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभते

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दिंड्यांपैकी तिसऱ्या क्रमांकाची मोठी दिंडी आमच्या रावगावातून जात असल्याने गावात आनंदाचे वातावरण असते. विठू माऊलीच्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीची मिरवणूक निघते, तेव्हा मन भारावून जाते. याच वेळी सर्व वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था गावातील प्रत्येक जण आपापल्या घरी करत असतो यानिमित्ताने वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळते हे आमच्यासाठी खरे भाग्य आहे.

– दत्तात्रय बरडे, ग्रामस्थ, रावगाव

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close