‘लव्ह जिहाद’ विरोधात करमाळ्यात बजरंग दलाचे आंदोलन; तहसीलदारांना निवेदन

करमाळा प्रतिनिधी/(माय मराठी न्यूज)


करमाळा येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने शुक्रवार दि. १७ एप्रिल रोजी तहसील कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
देशातील विविध भागात घडत असलेल्या ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर आणि इतर प्रकारच्या जिहादी प्रवृत्तींच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले की, सध्या वेगवेगळ्या स्वरूपात जिहादी कारवाया सुरू असून आता ‘कॉर्पोरेट जिहाद’ नावाने नवीन प्रकार समोर येत आहे. यामध्ये हिंदू समाजातील सुशिक्षित युवक-युवतींना लक्ष्य करून त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला जातो तसेच शारीरिक शोषण करून धर्मांतराचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या सर्व प्रकारांविरोधात बजरंग दल नेहमीच सजग राहून हिंदू समाजासोबत उभे राहील, अशी ग्वाही आंदोलनादरम्यान देण्यात आली. तसेच राष्ट्रविरोधी, बेकायदेशीर व समाजात तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.
तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात बजरंग दलाचे कार्यकर्ते व हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार लोकरे यांनी कार्यकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले.




