करमाळा तालुक्यात ग्रामरोजगार सहाय्यकांचे कामबंद आंदोलन; १८ महिन्यांपासून मानधन थकल्याची खंत

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्यात ग्रामरोजगार सहाय्यकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू केले असून, गेल्या १८ महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ आल्याची भावना ग्रामरोजगार सहाय्यकांनी व्यक्त केली. तालुका अध्यक्ष दत्ता हिरडे यांनी सांगितले की, केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने गाव, शेतकरी आणि शेतमजुरांच्या विकासासाठी योजना राबविल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष काम करणारे ग्रामरोजगार सहाय्यक मात्र आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
महाराष्ट्र शासनाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी ग्रामरोजगार सहाय्यकांना दरमहा ८ हजार रुपये मानधन आणि २ हजार रुपये प्रवास भत्ता देण्याचा शासन निर्णय काढला होता. मात्र त्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नसल्याने सहाय्यकांमध्ये नाराजी आहे. शेतकऱ्यांची लाखो रुपयांची कामे करून देताना स्वतःच्या घरचा खर्च भागवणे कठीण झाले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
तसेच केंद्र शासनाच्या २० मार्च २०२६ च्या परिपत्रकानुसार मजुरांची दिवसातून दोन वेळा ऑनलाइन हजेरी घेण्याचा नियम ग्रामीण भागातील नेटवर्क समस्येमुळे अडचणीचा ठरत असल्याने तो रद्द करावा, तसेच ग्रामरोजगार सहाय्यकांना विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागण्यांचे निवेदन करमाळा तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी दत्ता हिरडे, अनिल काळे, सचिन बोराडे, किरण मोरे, मारूती घोगरे, ॲड. हेमंत जाधव, अनिल तेली, अरूण गोळे, कांतीलाल भोसले, अंगद लांडगे आदी ग्रामरोजगार सहाय्यक उपस्थित होते.




