
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्यातील झरे गावातील ग्रामदैवत ज्योतिर्लिंग महाराज यात्रेमध्ये काही वर्षांपासून अश्लील नृत्य व अश्लील गाण्यांचे कार्यक्रम उघडपणे आयोजित होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी याविरोधात कडक भूमिका घेतली आहे. याबाबत झरे ग्रामपंचायतीच्या सरपंच मंजुश्री मयूर मुसळे यांच्यासह गावातील महिलांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, ज्योतिर्लिंग महाराजांची यात्रा ही धार्मिक, पारंपरिक आणि गावकऱ्यांच्या श्रद्धेशी निगडित आहे. या प्रकारामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. यात्रेमध्ये अशा प्रकारचे अश्लील कार्यक्रम हे यात्रेच्या पवित्र वातावरणाला बाधा आणणारे असून हे प्रकार ध्वनी प्रदूषण नियमाचे उल्लंघन करणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारे आहेत. त्यामुळे यंदाच्या यात्रेत अश्लील कार्यक्रम व ध्वनीप्रदूषणास तात्काळ बंदी घालून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी महिलांनी पोलीस प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन यात्रेदरम्यान पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच गावकऱ्यांनीही यात्रा भक्तिभावाने, शांततेत आणि उत्साहात साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती पोलीस निरीक्षक करमाळा पोलीस ठाणे, तहसीलदार करमाळा, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित यात्रा समिती यांनाही देण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
श्रद्धेच्या यात्रेला पावित्र्य हवे…
झरे गावचे ग्रामदैवत ज्योतिर्लिंग महाराजांच्या यात्रेमध्ये मागील काही वर्षांपासून उघडपणे अश्लील नृत्य व अश्लील गाण्यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. जोतिबाची यात्रा ही धार्मिक व पारंपारिक स्वरूपाची असून गावकऱ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तात्काळ कायदेशीर कारवाई करावी आणि गावकऱ्यांनीही यात्रा भक्तिभावाने साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे.
– मंजुश्री मयूर मुसळे, सरपंच, ग्रामपंचायत झरे.
महिलांच्या पुढाकाराचे स्वागत…
हा मुद्दा यापूर्वी ही ग्रामपंचायतीत मांडला होता. विद्यमान सरपंच आणि महिलांनी पुढाकार घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांची भेट घेऊन निवेदन दिल्याबद्दल एक ग्रामस्थ म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो.
– सोमनाथ जाधव, प्रहार शेतकरी संघटना, ता. उपप्रमुख करमाळा.



