-->
करमाळामहिलाविषयकराजकियविशेष

महिला दिन विशेष – “कुटुंबाचा पाठिंबा, जनतेचा विश्वास… महिलांसाठी काम करण्याचा नगराध्यक्षांचा निर्धार”

 

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

 

महिला नगराध्यक्ष म्हणून काम करताना सावंत परिवाराच्या राजकीय वारशाचा मोठा फायदा होत असल्याचे मत नगराध्यक्षांनी व्यक्त केले. माहेरकडून राजकीय पार्श्वभूमी नसली तरी विवाहानंतर सावंत परिवारातील राजकीय अनुभव, मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांचे सहकार्य यामुळे नगरपालिकेचा कारभार सक्षमपणे सांभाळता येत असल्याचे करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी माय मराठी न्यूजशी बोलताना सांगितले.

 

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, माजी नगराध्यक्ष स्व. दशरथ कोंडीबा सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य स्व. सुभाष अण्णा सावंत, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत, माजी पंचायत समिती सदस्य अँड. राहुल सावंत, सासरे भगवानराव सावंत तसेच गोपाल सावंत व विठ्ठल आप्पा सावंत यांचे मार्गदर्शन सातत्याने मिळत आहे. त्याचबरोबर सलग तीन वेळा नगरसेवक राहिलेले पती संजय सावंत आणि दिर सुनील सावंत यांचीही खंबीर साथ असल्यामुळे सामाजिक व राजकीय काम करणे अधिक सोपे झाले आहे.

 

घर, कुटुंब आणि मुलांची जबाबदारी सांभाळत राजकीय काम करणे शक्य झाले असून कुटुंबाने निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचेही त्यांनी सांगितले. काही गोष्टींमध्ये मार्गदर्शन घेत असले तरी स्वतः निर्णय घेण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संविधानामुळे महिलांना राजकारणात संधी मिळाली असून आरक्षणामुळेच नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारता आली, हेही त्यांनी नमूद केले. पुरुषप्रधान संस्कृती असली तरी नगरपालिकेच्या निर्णय प्रक्रियेत स्वतः भूमिका घेता येत असल्याचा अनुभव गेल्या दोन महिन्यांत मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

 

महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे त्यांनी कौतुक केले. महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर नगरपालिकेच्या माध्यमातून विधवा व परित्यक्ता महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना, मोफत अन्नधान्य योजना, अंत्योदय योजना तसेच बाल संगोपन योजनेबाबत जनजागृती करून लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

 

महिला दिनानिमित्त शहरातील विविध महिला संघटना आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सहकार्याने महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाटिका, एकांकिका, नृत्य, गायन, भक्तीगीत, भावगीत तसेच ‘खेळ पैठणीचा’ अशा उपक्रमांद्वारे महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

 

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन शहरातील शाळा, महाविद्यालये आणि मुलींच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. करमाळा पोलिसांच्या मदतीने 112 सेवा व निर्भया पथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असून संपूर्ण शहर सीसीटीव्ही यंत्रणेअंतर्गत आणण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

महिलांना सुरक्षित, स्वावलंबी आणि आत्मविश्वासाने जगता यावे यासाठी नगरपालिकेसह सावंत परिवार कटिबद्ध असल्याचे सांगत महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या सक्षमीकरणाचा निर्धार केल्याचे त्यांनी सांगितले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close