-->
करमाळाराजकिय

उजनीवरील चांडगाव–पोमलवाडी पूलाला ३४० कोटींची मंजुरी; विकासाचा नवा मार्ग खुला

 

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

 

महाराष्ट्र राज्याचा दि. ६ मार्च २०२६ रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात करमाळा व इंदापूर तालुक्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. उजनी धरणावर चांडगाव (ता. इंदापूर) ते पोमलवाडी (ता. करमाळा) दरम्यान उभारण्यात येणाऱ्या पुलासाठी तब्बल ३४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

सध्या या परिसरातील नागरिकांना उजनी धरण ओलांडण्यासाठी बोटीच्या सहाय्याने प्रवास करावा लागतो. त्यामुळे अनेक वेळा अडचणी निर्माण होत होत्या. हा पूल उभारला गेल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग तयार होणार असून पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

 

या पुलासाठी ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे ॲड. अजित विघ्ने, अशोक पाटील, सूर्यकांत पाटील, सुनील ढवळे, सचिन वेळेकर, प्रशांत नवले, नरेंद्र ठाकूर, उदय पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यानंतर माजी आमदार शिंदे यांनीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्याकडे निवेदन देऊन या पुलासाठी पाठपुरावा केला होता. याबाबत स्व. अजितदादा पवार यांनी इंदापूरचे आमदार व कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना या पुलासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही सातत्याने प्रयत्न करत अखेर या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात निधी मंजूर करून घेतला.

 

पुलाला मंजुरी मिळाल्याची बातमी समजताच पोमलवाडी, केत्तूर व परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केला. तसेच या पुलाला स्व. अजितदादा पवार यांचे नाव देण्याची मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर उजनीवरील वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटणार असून विकासाचा नवा मार्ग खुला होणार आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

या निर्णयाबद्दल ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे आभार मानले आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close