
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांची वीट जिल्हा परिषद गटातील मौजे वीट येथे भव्य जाहीर प्रचार सभा उत्साहात पार पडली.
या सभेत बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हणाले की, भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. विकासापासून वंचित राहिलेल्या तालुक्यातील प्रत्येक गावाला ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊन करमाळा तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलून दाखवण्याची ग्वाही त्यांनी दिली.
तालुक्यातील रस्ते, पाणीपुरवठा, ग्रामविकासाची कामे, मूलभूत सुविधा यासाठी महायुती कटिबद्ध असून निवडून येणारे सदस्य थेट ग्रामविकास खात्याशी समन्वय साधून कामे मार्गी लावतील, असा विश्वासही पालकमंत्री गोरे यांनी व्यक्त केला.
या प्रचार सभेस माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपा महिला आघाडीच्या नेत्या रश्मीदिदी बागल, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, युवा नेते दिग्विजय बागल, विलासराव घुमरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वीट जिल्हा परिषद गटातील हजारो नागरिकांनी या सभेला उपस्थिती दर्शवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सभेनंतर वीट जिल्हा परिषद गटासह संपूर्ण तालुक्यात गणेश चिवटे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.



