
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या सर्व संस्था ग्रामविकास खात्यांतर्गत येतात. त्यामुळे या संस्थांमध्ये असे लोकप्रतिनिधी निवडून द्या, जे थेट ग्रामविकास खात्यापर्यंत पोहोचू शकतात. तसेच उमेदवारांनी जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी पालकमंत्री व ग्रामविकास मंत्री म्हणून माझी आहे, असे ठाम प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी केले. ते वीट (ता. करमाळा) येथे भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
यावेळी बोलताना ना. गोरे म्हणाले की, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली बहुतांश कामे ग्रामविकास खात्याच्या माध्यमातूनच होतात. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये असे सदस्य निवडून द्या, जे थेट मंत्रालय व ग्रामविकास खात्यापर्यंत पोहोचू शकतील. करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महायुतीतील भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले. याचबरोबर मांगी तलावातील पाणी हे मांगी तलाव लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे. हे पाणी कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्यांना नेऊ देणार नाही, असे आश्वासन ही त्यांनी यावेळी दिले.
या सभेला माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मीदीदी बागल, विलासराव घुमरे, गणेश चिवटे, दिनेश भांडवलकर तसेच महायुतीतील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार, भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीका
सत्तेच्या प्रवाहाच्या विरोधात गेलेले आमदार किंवा लोकप्रतिनिधी निवडून दिल्यास त्या भागात विकासकामांचा दुष्काळ पडतो. याचा अनुभव सध्या तुम्ही विद्यमान आमदारांच्या रूपाने घेत आहात, असे सांगत पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. जयकुमार गोरे यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी आमदार जगताप यांनी भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा देण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल पालकमंत्री ना. गोरे यांनी त्यांचे आभार मानले.




