
प्रतिनिधी l केत्तूर (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्यातील केत्तूर गावात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली असून, जन्मदात्या पित्यानेच आपल्या दोन चिमुकल्या जुळ्या मुलांना विहिरीत ढकलून त्यांचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण करमाळा तालुका हादरून गेला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, किरकोळ कारणावरून रागाच्या भरात वडिलांनी दोन्ही मुलांना शेतात नेले. हिंगणी हद्दीतील शेतातील विहिरीत त्यांना ढकलून दिल्याने दोन्ही चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळाने संबंधित व्यक्तीने घरी फोन करून हा प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली; मात्र तोपर्यंत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. मृत शिवांश जाधव व श्रेवा जाधव (वय ७) ही जुळी मुले केत्तूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत शिक्षण घेत होती.
दरम्यान, निर्दयी वडिलांचे नाव सुहास जाधव (वय ३२) असून ते झरे येथील ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्रात ऑपरेटर म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. या अमानुष घटनेने केत्तूर परीसरात हळहळ व्यक्त होत असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.



