-->
करमाळासामाजिक

सामाजिक आश्रय लाभलेल्या “साप्ताहिक पवनपुत्र” ला राजकीय आश्रय मिळण्याची गरज– कवी देवेंद्र औटी

 

करमाळा l माय मराठी न्यूज 

 

नावाप्रमाणेच “पवनपुत्र” हा केवळ एक साप्ताहिक दिवाळी अंक नसून तो समाजमनाला स्पर्श करणारा, विचारांना चालना देणारा आणि वाचकांच्या संग्रहात मानाचे स्थान मिळवणारा अंक ठरला आहे. दर्जा, मांडणी, वैचारिक प्रगल्भता आणि सामाजिक बांधिलकी या सर्वच बाबतीत “पवनपुत्र” आज चोहोबाजूंनी समृद्ध झाला आहे. यामागे संपादक श्री. दिनेशजी मडके यांचे अथक परिश्रम, चिकाटी आणि निःस्वार्थ सामाजिक कार्य दडलेले आहे.

वर्षानुवर्षे समाजात कार्यरत राहून, स्वच्छ चारित्र्य, नितीमत्ता आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी “पवनपुत्र” या उपक्रमाला उभे केले. त्यामुळेच राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक व व्यापारी क्षेत्रातून या अंकाला भरभरून जाहिराती मिळतात. हा जाहिरातींचा ओघ म्हणजे केवळ आर्थिक पाठबळ नसून, समाजाने दिलेला विश्वास आणि मान्यतेचा शिक्का आहे. त्यामुळे “पवनपुत्र” हा निव्वळ अंक न राहता तो एक सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक चळवळ बनला आहे, जी मडके कुटुंबाने फार पूर्वीपासून जोपासली आहे.
तन, मन आणि धन अर्पण करून तयार केलेला हा अंक साहित्य क्षेत्रात एक मानदंड ठरावा इतका दर्जेदार आहे. समाजातील तळागाळापर्यंत पोहोचलेले हे साप्ताहिक विशेषतः कवी, लेखक, विचारवंत यांचे हक्काचे व्यासपीठ बनले आहे. नवोदित लेखकांना संधी देणे, दुर्लक्षित विषयांना वाचा फोडणे आणि सामाजिक प्रश्नांवर निर्भीडपणे भूमिका मांडणे हे “पवनपुत्र” चे वैशिष्ट्य आहे.

संपादक श्री. दिनेशजी मडके यांच्या सामाजिक कार्याचाच हा अंक एक परिपाक म्हणावा लागेल. सामान्य माणसाशी प्रेमाने जोडलेली नाळ, दुःखात धावून जाण्याची वृत्ती आणि माणुसकीची जाण हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक पैलू आहेत. माझ्या वैयक्तिक अनुभवातून सांगायचे झाल्यास, ते मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षांपासून रुग्ण व इतर सामाजिक कामांसाठी भेटत आले आहेत. फोनवरूनही त्यांच्या कामातून माझी सेवा घडलेली आहे. अडचणीच्या प्रसंगी ते मोठ्या भावाच्या नात्याने निःसंकोच मार्गदर्शन मागतात. हे नाते केवळ औपचारिक नसून आपुलकीचे, कौटुंबिक आणि निगर्वी आहे.

अशा प्रकारे दिनेशजी मडके हे एका अर्थाने करमाळा तालुका व संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची राजकीय, सांस्कृतिक आणि पत्रकारितेतील शुद्ध व निर्मळ संपदा आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. म्हणूनच जाहिरातींच्या निमित्ताने त्यांना एक प्रकारचा जाहीर पाठिंबाच मिळतो आहे.

वैयक्तिक जीवनातही दिनेशजींनी अनेक दुःख, संकटे आणि आव्हानांना तोंड दिले आहे. कुटुंबातील आजारपण, आर्थिक अडचणी आणि इतर संकटांमध्ये ते एकटेच खंबीरपणे उभे राहिले. मात्र कधीही त्यांनी आपल्या पत्रकारितेचा गैरवापर करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला नाही. माणसाची जाण, भान आणि सन्मान त्यांना नेमकेपणाने माहिती आहेत, हे त्यांच्या वागण्यातून सातत्याने दिसून येते.

म्हणूनच आज गरज आहे ती अशा स्वाभिमानी, विद्वान आणि समाजात प्रतिष्ठा असलेल्या तरुण पत्रकाराला राजकीय व्यक्ती व संस्थांनी मानाने आश्रय देण्याची. सामाजिक संघटनांनी पुरस्कारांच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. कारण अशा व्यक्तींना पाठबळ दिल्यास समाजात चारित्र्य, परोपकार, ज्ञान आणि चांगुलपणा यांची प्रतिष्ठापना होऊ शकते.

तळागाळापर्यंत पोहोचलेल्या आणि समाजमन घडवणाऱ्या “साप्ताहिक पवनपुत्र” ला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. ही वैचारिक मशाल अधिक तेजाने पेटत राहो, हीच अपेक्षा.
– कवी : देवेंद्र औटी

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close