सिनेचे रौद्ररूप! १५ दिवसांत तिसऱ्यांदा महापूर, आळजापूर पुलावर पहिल्यांदाच पाणी

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


सिना नदीने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केले असून तब्बल ८० हजार क्यूसेक्सहून अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाटबंधारे उपविभाग आष्टी (जि. बीड) च्या अधिपत्याखालील सीना नदीस मिळणाऱ्या नद्यांवरील प्रकल्पांच्या सांडव्यातून आज दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी बारा वाजल्यापासून ५६,८५३ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यात निमगाव गांगर्डी (ता.जामखेड) धरणातून २४,००० क्यूसेक्स व करमाळा तालुक्यातील मांगी तलावातून ४,५०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग नदीत मिसळल्याने सीनेने रौद्ररूप धारण केले आहे.

गेल्या पंधरा दिवसांत सीना नदीला आलेला हा तिसरा महापूर असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. इतिहासात पहिल्यांदाच करमाळा–जामखेड मार्गावरील आळजापूर येथील सीना नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले असून पुलापासून तब्बल शंभर फूट अंतरावर पाणी पसरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून करमाळा व जामखेड पोलिसांनी वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे.


सिना नदीचे हे रौद्ररूप पाहून संभाव्य धोका टाळण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून करमाळा महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने एसटी महामंडळ, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सीना नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे.



