
प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


आंतरराष्ट्रीय स्तरावर २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र यंदा २८ सप्टेंबर २०२५ रोजी रविवार असल्यामुळे सोमवार, दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी करमाळा तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेतर्फे विविध शासकीय कार्यालयांना शुक्रवारी निवेदन देऊन करण्यात आली.
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १२ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या पत्रकानुसार, २८ सप्टेंबर रोजी रविवार असल्याने माहिती अधिकार दिन सोमवार, २९ सप्टेंबर रोजी विविध उपक्रमांनी साजरा करावा, असे नमूद आहे. त्यानुसार तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका भूमी अभिलेख कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, करमाळा नगरपरिषद व महावितरण उपअभियंता यांना हे निवेदन देण्यात आले.
या वेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे करमाळा तालुकाध्यक्ष विशाल परदेशी, तालुका उपाध्यक्ष दिलीप क्षीरसागर, शहराध्यक्ष आझाद शेख, तालुका संघटक फारुक जमादार, उपसंघटक देविदास साळुंखे, तालुका प्रचारक विशाल राठोड, प्रचार प्रमुख अंगद भांडवलकर तसेच कार्यकर्ते आयुब शेख उपस्थित होते.



