माय मराठी न्युज नेटवर्क


औरंगाबाद शहरामध्ये मुलगी दुसऱ्या मुलासोबत पळून गेल्याने हताश झालेल्या पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात आपल्या मुलीचे लग्न अवघ्या ५ दिवसांवर येऊन ठेपले असल्याने बाप मुलीच्या लग्नाची सर्व तयारी करण्यात व्यस्त होता. मात्र, दुसरीकडे मुलीच्या मनात वेगळाच विचार सुरु होता. अवघ्या ५ दिवसांवर लग्न आलेले असताना मुलगी पळून गेली. आता समाजात आपली बदनामी होणार, लोकांना काय तोंड दाखवू या भीतीने हताश झालेल्या मुलीच्या बापाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सदर घटना शनिवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी रात्री घडली आहे. औरंगाबाद शहरातील संग्राम नगर उड्डाण पूलाजवळ घडलेल्या या घटनेतील मृताची रविवारी सकाळी ओळख पटली. दरम्यान, बापाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत आपल्या मुलीला पुन्हा घरात घेऊ नका असे त्यांनी म्हटले असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे औरंगाबाद शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं चिठ्ठीत काय लिहिलं आहे?
आपली मुलगी पळून गेल्याचे प्रचंड दुःख मुलीच्या वडिलांना झाले होते त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या देखील केली. दरम्यान, त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पँटच्या खिशात एक चिट्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी पत्नीला उद्देशून लिहिले आहे की, ‘मी हे जग सोडून जात आहे. माझ्या मृत्यूनंतर मुलीला कधीही आपल्या घरात प्रवेश देऊ नको. माझ्या मुलाचे लग्न चांगले लाव. तू कायम आठवणीत राहशील, मात्र त्या मुलीला आता माझ्या घरात कधीही स्थान नाही’. या मजकुराखाली मृत व्यक्तीने सही केली होती. जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी उड्डाण पुलाजवळ धाव घेतली. पुढील अधिक तपास पोलीस करीत आहेत. ©️wd




