-->
करमाळासामाजिक

आदिनाथ सहकारी तत्त्वावर सुरू करण्याचा बचाव समितीचा निर्णय; कर्मचाऱ्यांचाही या निर्णयाला एक मुखी पाठिंबा

तालुक्यातून तीस कोटी रुपये उभा करण्याचे नियोजन; गावोगावी महिनाभर बैठका घेणार

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरू करणे फार अवघड गोष्ट नसून ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी यांनी एकत्रित मनापासून काम केल्यास आदिनाथला गतवैभव प्राप्त होईल यात शंका नाही. परंतु राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सर्वांनी एकजुटीने कामाला लागावे असे आवाहन आदिनाथ कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांनी केले केले.

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आज आदिनाथ च्या सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कर्मचाऱ्यांनी आम्हाला गेली पाच वर्षापासून पगार नाही, आमच्या वसाहतीमध्ये लाईट नाही, पाणी नाही, आमची उपजीविकेचे साधन बंद झाले आहे अशा अडचणी मांडल्या. यावर साधक बाधक चर्चा होऊन सहकार तत्वावर आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालवला जात असेल तर सर्व कर्मचारी दोन पाऊल मागे घेऊन सहकार्य करण्यास तयार असल्याचे सर्व कर्मचाऱ्यांनी एकमुखी निर्णय घेऊन सांगितले.

या निर्णयाचे हरिदास डांगे यांनी स्वागत करून पुढे म्हणाले की, कारखाना काम सुरू झाल्यानंतर दर महिन्याला कामगारांना पगार दिला जाईल व गाळप सुरू झाल्यानंतर प्रत्येक महिन्याचा पगार अधिक मागील पगारातील पाच टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र कर्मचाऱ्यांनी हा कारखाना आपला आहे असे समजून प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. आदिनाथ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची व्यथा डोळ्यात पाणी आणणारी असून या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या घामाचा दाम पूर्णपणे परत देऊ असे आश्वासन हरिदास डांगे यांनी दिले. मात्र, कारखान्याचे चक्र चांगल्या पद्धतीने फिरले पाहिजे असेही आवाहन केले.

यावेळी प्राध्यापक शहाजीराव देशमुख, प्राचार्य जयप्रकाश दिले सर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, कामगार प्रतिनिधी महादेव मस्के, शिंगटे, प्राध्यापक संजय चौधरी, डॉ. वसंत पुंडे, मकाईचे संचालक संतोष पाटील, प्राध्यापक शिवाजीराव बंडगर, महेंद्र पाटील, बाळासाहेब ढेरे, नवनाथ केकान, रवींद्र गोडगे, अण्णासाहेब सुपनर, आदिनाथचे माजी संचालक रोकडे मामा, दत्तात्रय गिरमकर आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी कर्मचाऱ्यांच्या वतीने हरिदास डांगे यांचा सत्कार करण्यासाठी भव्य हार, फेटा आणण्यात आला होता. मात्र, डांगे यांनी हा सत्कार न स्वीकारता ज्या दिवशी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मोळी टाकण्याचा कार्यक्रम होईल त्याच दिवशीच मी कारखान्यात सत्कार स्वीकारणार आहे. अशी घोषणा आदिनाथ चे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांनी यावेळी केली.

निवडणुकीत राजकारण आले तर समितीतून बाहेर जाणार

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लवकरच होत असून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वच गटातटाच्या नेत्यांनी आम्हाला साथ द्यावी. पाच वर्षानंतर सर्वांनी राजकारण करावे. मात्र आदिनाथ चालू करण्यासाठी आता उशीर करणे धोक्याचे ठरेल. यामुळे आदिनाथ चा कारभार राजकारण विरहित झाला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. या भूमिकेला तडा गेला तर मला नाईलाजाने या प्रक्रियेतून बाहेर जावे लागेल.
हरिदास डांगे
माजी कार्यकारी संचालक, आदिनाथ सह.सा. कारखाना

आजच्या या बैठकीला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास २०० कर्मचारी या बैठकीसाठी उपस्थित होते. या सर्व कर्मचाऱ्यांनी कारखाना सहकार तत्त्वावर चालला पाहिजे असा ठराव केला व हा कारखाना आम्ही प्रामाणिकपणे चालू करू अशी शपथ सर्व कर्मचाऱ्यांनी आदिनाथ महाराजांच्या साक्षीने घेतली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close